flower market : बाजारात झेंडुच्या फुलांची आवक घटली, दसरा- दिवाळीला भाव तेजीतच राहणार

flower market : राज्यातील शेतकरी झेंडुच्या फुलांची शेती दरवर्षी मोठ्या प्रमाणात करीत असतात. यंदाही संबंधित सर्व शेतकऱ्यांनी झेंडुची लागवड केली होती. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याने यावर्षी झेंडुपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकलेले नाही. ठिकठिकाणच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही झेंडुची आवक लक्षणीय घटली आहे. एकूण चित्र लक्षात घेता दसरा व दिवाळीला झेंडुची फुले भाव खाण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.

झेंडुचे पीक हे प्रामुख्याने थंड हवामानात जोमदारपणे वाढणारे पीक आहे. उष्ण हवामानात झेंडूची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही, फुलांचा दर्जाही फार चांगला नसतो. त्यामुळे बाजारात झेंडुला पाहिजे तसा भाव देखिल मिळत नाही. तसे पाहिले तर झेंडूची फुलशेती पावसाळी, हिवाळी व उन्हाळी हंगामात करता येते. मात्र, शेतकऱ्यांचा अनुभव लक्षात घेता झेंडूची लागवड जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादन मनाजोगते मिळते. या काळात झेंडुच्या फुलांचा दर्जाही चांगला असतो. ज्या शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात झेंडुची लागवड केलेली असते, त्यांना साधारण ऑक्टोबर ते एप्रिलच्या कालावधीत भरपूर व दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळते. लग्नसराईची मागणी लक्षात घेऊन सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या झेंडुपासुनही भरघोस उत्पादन मिळते. यंदा जुलै महिन्यात लागवड झालेल्या झेंडुपासून आता फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाळा अपेक्षेनुसार न झाल्याने शेतकऱ्यांना झेंडुपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकलेले नाही. त्याचा परिणाम बाजार समितीत होणाऱ्या फुलांच्या आवकेवर देखिल झाला आहे.

जळगावमध्ये झेंडुला मिळतोय सर्वाधिक भाव

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (ता. 23 ऑक्टोबर) जळगाव बाजार समितीत झेंडुच्या फुलांची 20 क्विंटल आवक झाली, त्यास 3000 ते 4000 रूपये आणि सरासरी 3500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपूरमध्ये झेंडुची 12 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 2500 आणि सरासरी 2000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. पुणे बाजार समितीत झेंडुची सुमारे 1762 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 4000 आणि सरासरी 3000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articlemaize market : मक्याला ‘या’ मार्केटमध्ये सर्वाधिक भाव, राज्यात दररोज 500 क्विंटलपर्यंत आवक
Next articleapmc market : जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दादर ज्वारी 4500 रूपये प्रतिक्विंटल