तरुणाने ग्रामीण भागात कसा नावारुपाला आणला? दुधाचा पद्मालय ब्रँन्ड !

जळगाव । गावशिवार न्यूज । जितेंद्र पाटील । जिल्ह्यात गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या दापोरी (ता. एरंडोल) सारख्या जेमतेम 700 ते 800 लोकसंख्येच्या गावात पवन पुंडलिक पाटील या तरुणाचा डेअरी फार्म आहे. त्यामाध्यमातून पवन पाटील यांनी दुधाचा पद्मालय ब्रँड नावारुपाला आणला असून, जळगाव शहरात असंख्य ग्राहक जोडले आहेत. त्यांच्याकडे संयुक्त कुटुंबाची 100 एकरावर शेती आहे. त्यांचे वडील व काका सर्व शेती सांभाळतात. पवन पूर्णपणे दुग्ध व्यवसाय पाहतात.

आरोग्यदायी दुधाचे उत्पादन….
पद्मालय डेअरीवर उत्पादित होणारे दुध प्रामुख्याने जळगाव शहरात वितरीत होते. विविध उपनगरात विखुरलेल्या ग्राहकांपर्यंत पोचविले जाणारे दुध ताजे, सकस व निर्भेळ असावे, याबाबतीत पवन पाटील डोळ्यात तेल घालून काळजी घेतात. त्यासाठी त्यांनी दापोरी गावातच होमोजिनेशन व पाश्‍चरायझेशन प्रक्रिया करणारी यंत्रणा बसवून घेतली आहे. तसेच दुध थंड करण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. गायी व म्हशीच्या धारा काढण्यासाठी मिल्किंग मशिनचा वापर केला जातो. परिणामी, दुधाची हातळणी कमी होते. शुद्धता कायम राखली जाते. ग्राहकांपर्यंत दुध उशिरा पोचले तरी नासत नाही.

प्रक्रियेवर विशेष भर…
पवन यांनी 4 गायींपासून व्यवसायाची सुरवात केली होती. आज त्यांच्या गोठ्यात जातिवंत 20 गायी, 45 जाफराबादी म्हशींची संख्या आहे. दोन्ही वेळचे मिळून 200 ते 225 लिटरपर्यंत दूध संकलन होते. ग्राहकांची गरज भागवून शिल्लक राहिलेल्या दुधापासून दही, ताक, तूप तयार करण्यावर त्यांचा भर असतो. पैकी तुपाची जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होते. दही, ताक व लस्सी यांची उन्हाळ्यात विशेष मागणी असते. शिरसोली, वावडदा व म्हसावद गावातील बहुतांश किरकोळ विक्रेते पद्मालय ब्रॅन्डची उत्पादने विक्रीसाठी ठेवतात. आकर्षक पॅकिंगवर पद्मालय ब्रॅंडचे लेबल, उत्पादन तिथीचा उल्लेख असतो. फूड सेफ्टी (अन्न सुरक्षितता) विषयातील एफएसएसआय, या संस्थेचे गुणवत्ता प्रमाणपत्र घेतले आहे. त्याचा लोगो पॅकिंगवर असतो. या सर्व गोष्टींमुळे त्यांची उत्पादने ग्राहक निश्चिंत मनाने खरेदी करतात.

दुधाळ जनावरांसाठी मुरघास….
पवन पाटील यांनी गोठ्यातील दुधाळ जनावरांची गरज भागविण्यासाठी तीन एकरावर हिरव्या वैरणीची लागवड केली आहे. त्यामाध्यमातून त्यांना बारमाही हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. याव्यतिरिक्त दुधाळ जनावरांचे चांगले पोषण व्हावे म्हणून त्यांनी आता मुरघास निर्मितीवर भर दिला आहे. त्याकरीता ड लवाल कंपनीचे खास विरजण वापरले जाते. मुरघास निर्मितीसाठी लागणारा हिरवा मका परिसरातील शेतकऱ्यांकडून गरजेनुसार खरेदी केला जातो. मुरघासचा वापर वाढविल्यापासून दुधाचे उत्पादन वाढण्यासह जनावरांना पुरेसे पोषण मिळू लागले आहे. विशेष म्हणजे दुधाच्या उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचा अनुभव आलेला आहे.

पद्मालय डेअरी फार्मची वैशिष्टे….

  • गायींसाठी मुक्त संचार गोठा पद्धती.
  • दुधाळ जनावरांना खाद्य म्हणून हिरवी वैरण व मुरघासची सोय.
  • दुध काढण्यासाठी मिल्किंग मशिनचा वापर.
  • दुधावर होमोजिनेशन व पाश्‍चरायझेशन प्रक्रिया.
  • पद्मालय ब्रँडने पिशवीबंद दूध पॅकिंग.
  • दही विरजणासाठी कल्चरचा वापर.
  • जळगाव शहरात वितरणासाठी स्वतंत्र यंत्रणा.

संपर्क : पवन पाटील
मो.8329486398

WhatsApp Group
Previous articleमहाराष्ट्रात बटाटा 1050 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल
Next articleहिरव्या मिरचीची आवक घटली, दर 10 ते 40 रूपये प्रतिकिलो