Success Story: कलिंगडाच्या वाया गेलेल्या पिकात जादुची कांडी फिरली….शेतकरी 65 दिवसातच बनला ‘लखपती’

Success Story: देव तारी त्याला कोण मारी, असे आपण नेहमीच म्हणतो….प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्यातील लोणी (ता. चोपडा) येथील शेतकरी श्री.अरूण पांडुरंग पाटील यांना 65 दिवसातच लखपती झाल्याचे बघितल्यावर देव अजुनही कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याची प्रचिती नक्कीच येते. झाले असे की, अरूण पाटील यांनी सुमारे 6 एकर शेतीत यंदा खरिपात कलिंगडाची लागवड केली होती. दुर्दैवाने लागवडीनंतर बरेच दिवस झाले तरी अपेक्षित वाढ न झाल्याने त्यांना डोक्याला हात लावावा लागला. करावे काय काही सुचेना पण अचानक मदतीला देवदूत धावावा त्याप्रमाणे एक कृषीतज्ज्ञ त्यांच्या मदतीचा धावला. जादुची कांडी फिरावी त्याप्रमाणे कलिंगडाचे पीक बहरले, ज्याने शेतकरी पाटील यांना लखपती बनवून सोडले.

A farmer became a ‘millionaire’ within 65 days

चोपडा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी खरिपात कापसाव्यतिरिक्त केळी, पपई, कलिंगड तसेच भाजीपाला पिकांची ताजा पैसा देणारी शेती करण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. लोणी येथील रहिवासी श्री. अरूण पांडुरंग पाटील त्यापैकीच एक आहेत. वडिलोपार्जित शेतीत तसेच दुसऱ्या शेतकऱ्यांकडून कसण्यासाठी घेतलेल्या शेतीत ते केळी, पपईची लागवड दरवर्षी करतातात. यंदाच्या खरिपातही त्यांनी सुमारे 6 एकर शेती ही पपई लागवडीसाठी राखीव ठेवली होती. आवश्यकतेनुसार जमिनीची चांगली मशागत केल्यानंतर त्यांनी छान बेड तयार करून घेतले होते. त्यावर प्लास्टिकचा मल्चिंग पेपर सुद्धा अंथरून घेतला होता. दरम्यान, पपईच्या 15 नंबर जातीची रोपे तयार करून त्यांची शेतात लागवड झाल्यावर आंतरपीक घेण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली. पपईत मिरचीचे आंतरपीक घेण्याच्या विचारात असतानाच त्यांचा गुजरात राज्यातील सागर बायोटेकचे जनरल मॅनेजर व पारोळा तालुक्याचे मूळ रहिवासी कृषीतज्ज्ञ श्री. भगवान पाटील यांच्याशी संपर्क आला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी सप्टेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात 3 एकरावर सागर बायोटेकच्या सागर किंग गोल्ड वाणाच्या कलिंगडाची लागवड पूर्ण केली. आणखी 10 दिवसांच्या अंतराने उर्वरित 3 एकर क्षेत्रावर सागर बायोटेक कंपनीच्याच मारवेल वाणाच्या कलिंगडाची लागवड पूर्ण केली. पावसाळ्यात कलिंगडाचे पीक घेणे तसे खूपच जोखमीचे होते, पण त्यांनी सागर बायोटेकच्या दर्जेदार बियाण्यांवर विश्वास ठेवून ती हिंमत केली.

35 दिवस झाले तरी कलिंगडाचे वेल वाढलेच नाही

अरूण पाटील यांनी मोठ्या आशेने पपईत आंतरपीक म्हणून कलिंगडाची 8 बाय 1.5 फूट अंतरावर दोन वाणांची लागवड तर केली. परंतु, लागवडीपासूनच प्रतिकूल हवामानाने त्यांचा पिच्छा पुरविला. कलिंगडाच्या पिकाचा कालावधी जेमतेम 65 दिवसांचा असताना, लागवड होऊन 35 दिवस झाले तरी त्यांच्या शेतातील कलिंगडाचे वेल वाढण्याचे नावच घेत नव्हते. काय करावे म्हणून शेतकरी पाटील चिंताग्रस्त होऊन बसले. गावातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील कलिंगडाचे पीक पाहण्यास येऊन गेले. पैकी काहींनी धीर देत संयम राखण्याचा सल्ला दिला तर काहींनी सरळ वेल उपटून बाहेर फेकण्याचा सल्ला दिला.

नंतर अशी काही जादुची कांडी फिरली की….

6 एकरावरील कलिंगड पिकाची वाताहत झाल्याने दुखी झालेले शेतकरी अरूण पाटील यांची व्यथा सागर बायोटेकचे जनरल मॅनेजर श्री. भगवान पाटील यांना समजली. त्यांनी तत्काळ अरूण पाटील यांच्याशी संपर्क साधला. धीर देऊन कलिंगडाचे पीक सुधारण्यासाठी कोणत्या कृषी निविष्ठांचे डोस तातडीने देण्याची गरज आहे, त्याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. वैफल्यग्रस्त झालेले शेतकरी अरूण पाटील यांनी हा पण एक शेवटचा उपाय करून पाहू, असे म्हणत नाईलाजाने कलिंगडाच्या पिकाचे व्यवस्थापन सुधारले. आणि काय आश्चर्य झाले की कलिंगडाचे वाढ खुंटलेले वेल जोमदार वाढू लागले. रिकामे दिसणारे शेत काही दिवसातच भरून निघाले. फुल व फळधारणा सुरु झाल्यानंतर शेतकरी पाटील यांचा आनंद गगनात मावला नाही.

कलिंगडापासून एकरी 1 लाखापेक्षा जास्त कमाई

कलिंगडाचे पीक जोमदार वाढू लागल्यानंतर अरूण पाटील यांनीही व्यवस्थापनात कोणतीच कसर सोडली नाही. फळमाशी, थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी शेतात ठिकठिकाणी पिवळे व निळे चिकट तसेच कामगंध सापळे लावून घेतले. ठिबकवाटे विविध प्रकारच्या विद्राव्य रासायनिक खतांची शिफारशीनुसार मात्रा देणे सुरु ठेवले. वेलींचा विस्तार वाढला तसा फळांचा आकारही वाढू लागला. समोरचे न भूतो न भविष्यती दृश्य पाहून परिसरातील शेतकऱ्यांनीही तोंडात बोट घातले. स्वतः शेतकरी अरूण पाटील यांचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. सुरुवातीला त्यांना संपूर्ण 6 एकरात 50 टनापर्यंत कलिंगडाचे उत्पादन येण्याची आशा होती. पण त्यांच्या नशिबात कदाचित यावेळी छप्परफाड कमाई होती. कारण, त्यांच्या अपेक्षेच्या दीडपट कलिंगड फळांचे उत्पन्न त्यांना मिळाले. सरासरी 9 रूपये प्रतिकिलोचा दर व्यापाऱ्याने जागेवर दिल्याने एकरी एक लाखापेक्षा जास्त कमाई त्यांना फक्त 65 दिवसातच मिळाली.

संपर्क : श्री.अरूण पांडुरंग पाटील, 96239 75717

WhatsApp Group
Previous articleSoyabean Market Rate: महाराष्ट्रात सोयाबीनला ‘या’ मार्केटमध्ये मिळाला 5,151 रूपये प्रतिक्विंटलचा भाव
Next articleJalgaon Drought News: जळगाव जिल्ह्यात 14 तालुक्यांच्या 67 महसूली मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर