Government Resolutions : ग्रामीण भागात राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना अधिक गतीमान करण्यासाठी राज्यात 20 नोव्हेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ‘महाआवास अभियान’ राबविण्यात येणार आहे. भूमिहीन गरजू लाभार्थींना हक्काची जागा उपलब्ध करण्यासह घरकुलांना उद्दीष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरीत करणे, सर्व मंजूर व प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, बहुमजली इमारती, गृहसंकुलांची उभारणी करणे आदी बरेच उपक्रम अभियानात राबविले जाणार आहेत.
Maha Awas Abhiyan will be implemented to speed up the Awas scheme
सर्वांसाठी घरे-2024 या शासनाच्या धोरणांतर्गत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना,अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतीमान करणे व त्यात गुणवत्ता आणण्याचा मुख्य उद्देश ‘महाआवास अभियान’ राबविण्यातून जोपासला जाणार आहे. त्याअनुषंगाने येत्या 20 नोव्हेंबरला असलेल्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून ‘महाआवास अभियान- 2023/24’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
‘महाआवास अभियान’ राबविण्याचे उद्देश
■ राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गती देणे.
■ ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांचेबरोबरच समाजातील लायन्स क्लब, रोटरी क्लब या सारख्या स्वयंसेवी संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संघ, अन्य खासगी संस्था, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचा सहभाग वाढविणे.
■ ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थींचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून आणणे.
■ ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमताबांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभारणे.
■ ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे.
■ याशिवाय नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील लॅन्ड बँक, जि.प.गट स्तरावरील सॅन्ड बँक व घरकुल मार्ट, मॉडेल हाऊसेसची संकल्पना प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)