Indian Railways : पुणे ते भुसावळ दरम्यान धावणारी हुतात्मा एक्सप्रेस आता पुणे ते अमरावती धावत आहे. त्यामुळे भुसावळ- जळगाव भागातून मुंबई-पुण्याकडे जाण्याकरीता मोठी अडचण झालेली असताना, विस्तारीत रेल्वेगाडीची वेळही प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरली आहे. त्याबद्दल सर्वत्र तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. दुर्दैवाने जळगावचे लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून बसले आहेत.
Will Amravati-Pune Express time be changed for passengers of Bhusawal, Jalgaon?
पुणे- भुसावळ (11026/11025) ही गाडी पूर्वी पनवेल, कल्याणमार्गे धावत असे. पुण्याला जाण्यासाठी ती थोडी वेळखाऊ असली तरी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ती कल्याणपर्यंत खूपच सोयीची होती. दरम्यान, रेल्वे खात्याने सदरची गाडी मधल्या काळात फक्त इगतपूरी ते भुसावळपर्यंत केली. त्यामुळे जळगाव-भुसावळ भागातील प्रवाशांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त करून सदरची गाडी पूर्ववत भुसावळ ते पुणे करण्याची मागणी लावून धरली. प्रत्यक्षात मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करून पुणे ते भुसावळ एक्सप्रेसला दौंड, अहमदनगर, मनमाडमार्गे थेट अमरावतीपर्यंत नेण्याचा घाट घातला. रेल्वे मंत्रालयाने त्याला तात्काळ मंजुरी दिल्याने हुतात्मा एक्सप्रेस आता पुणे-भुसावळऐवजी पुणे-अमरावती अशा नावाने धावत आहे. उरूळी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा या स्थानकांवर त्याला थांबा सुद्धा दिलेला आहे.
हुतात्माची वेळ बदलण्याचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव
अमरावती ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस आता भुसावळहून न सुटता अमरावती येथून सुटत आहे. मात्र, सदरची गाडी भुसावळ स्थानकावर मध्यरात्रीनंतर 2.35 वाजता पोहोचते आणि त्यानंतर ती पुढे जळगावकडे रवाना होते. सदरची गाडी पकडण्यासाठी अर्थातच पुणे जाणाऱ्या प्रवाशांना रात्री दोन वाजता रेल्वे स्थानकावर धावपळ करत पोहोचावे लागते. अशा स्थितीत थोडाही डोळा लागला तरी गाडी सुटण्याचा प्रसंग उद्भवतो. हुतात्मा एक्सप्रेस पूर्वी भुसावळ येथून रात्री 12.30 वाजता सुटत असे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे व्हायचे. आता तशी सोय राहिलेली नाही. एकूण परिस्थिती लक्षात घेता अमरावती-पुणे हुतात्मा एक्सप्रेसची वेळ बदलण्याचा प्रस्ताव भुसावळच्या डीआरएम इति पांडे यांनी देखील रेल्वे बोर्डाकडे पाठविला असल्याचे सांगितले जाते आहे. लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)