Jalgaon News : शेळगाव बॅरेजला मिळाली आणखी 12 हेक्टर जमीन, 100 % पाणीसाठा होणार

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील यावल तसेच जळगाव आणि भुसावळ तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्यासह, सिंचन आणि उद्योगासाठी महत्वाचा ठरू शकणाऱ्या शेळगाव बॅरेज प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 11.95 हेक्टर जमीन जळगाव वन विभागाकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प 100 टक्के क्षमतेने भरण्यास मदत होणार आहे.

Shelgaon barrage got another 12 hectares of land, 100% water storage will be done

शेळगाव बॅरेज तापी नदीवर आहे. यामुळे एक हजार 128 हेक्टर शेतजमीनच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. जळगाव, भुसावळ येथील औद्योगिक विकास महामंडळ, खासगी औद्योगिक वसाहती, खासगी उद्योग, भुसावळ शहर, भुसावळ रेल्वे जंक्शन, रेल्वे वसाहतीसाठी धरणाच्या आसपास असलेल्या जळगाव, भुसावळ व यावल तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी हा प्रकल्प लाभदायी ठरणार आहे. शेळगाव बॅरेजमध्ये शंभर टक्के पाणी साठा होण्यासाठी अजून 11.95 हेक्टर जमिनीची गरज होती. त्यासाठी राज्य‌ शासनाच्या वतीने केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार केंद्र सरकारने नागपूर वन विभागाच्या पूर्व संमतीने जळगाव वन विभागाकडे जमीन हस्तांतरणासाठी परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तीन महिन्यांत वन विभागाची जमीन मिळवून दिली. या अतिरिक्त जमिनीमुळे शेळगाव बॅरेजमध्ये शंभर टक्के पाणी साठा होण्यास मदत होणार आहे. जळगाव, यावल, भुसावळ, चोपडा तालुक्यातील गावांमध्येही सिंचनाची मोठी सोय होईल. अनेक पिढ्यांसाठी हे धरण उपयुक्त ठरणार आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील महसूल विभागाची जागा वन विभागास दिल्यामुळे शेळगाव बॅरेज साठी ही जागा उपलब्ध झाली आहे.

बॅरेजचे उर्वरित काम आता मार्गी लागणार

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याप्रकरणी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. नागपूरच्या वनविभागाच्या बैठकाही घेतल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व खासदार उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा करीत ही जमीन वन विभागाकडून मिळवली. केंद्राकडून हिरवा कंदील मिळल्यामुळे शेळगाव प्रकल्पातील जलसाठा १०० टक्के क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धरण परिसरात वनजमिनीच्या जागेमुळे शेळगाव धरणातील साठा पूर्णक्षमतेने भरण्यास अडचण येत होती. आता केंद्राने मंजूरी दिल्याने बॅरेजचे उर्वरित काम मार्गी लागणार आहे.

WhatsApp Group
Previous articleJalgaon News : जळगाव जिल्ह्यात 45 जणांचे शस्त्र परवाने रद्द, गैरप्रकारांना बसणार आळा
Next articleJalgaon Polytics : जळगावात एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला भाजपच्या महिलांकडून चपलांचा मार