Jalgaon Polytics : खान्देशातील सर्वात मोठ्या म्हणजेच 15 तालुक्यांच्या जळगाव जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगलेच ढवळून निघाले आहे. त्याला कारणीभूत ठरली आहेत दोन धुरंधर नेत्यांमधील वादग्रस्त वक्तव्ये आणि त्यामुळे एकमेकांना भिडलेल्या समर्थकांनी भरचौकात केलेली तीव्र आंदोलने. या सर्व वावटळीत जिल्ह्याच्या राजकारणातून अचानकपणे बाहेर फेकले गेलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याभोवती पुन्हा जळगावचे राजकारण केंद्रित होत असल्याचे संकेत मात्र मिळू लागले आहेत.
कधीकाळी म्हणजे तत्कालिन जळगाव नगरपालिकेचा घरकूल घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी सुरेशदादा जैन यांच्याशिवाय कोणाचे पाटले इकडचे तिकडे हलत नव्हते. सुरेशदादा जैन सांगतील तीच पूर्व दिशा असे. जळगाव नगरपालिका सोडा खेडेगावातील ग्रामपंचायतीचा सरपंच व विकास सोसायटीचा चेअरमन हा सुरेशदादांना विचारल्याशिवाय पुढचे पाऊल टाकत नव्हता. दादांनी जितक्याही वेळा पक्ष बदलले तितक्या वेळा जळगावकरांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या त्या कामाची पावती म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सर्वप्रथम गृहनिर्माण मंत्री पदावर विराजमान देखील केले होते. सुरेशदादांच्या विकासकामांचा त्यावेळी झंझावात असा होता, की आजही जळगाव शहरात जेवढी काही भव्यदिव्य कामे नागरिकांना पाहायला मिळताहेत, ती सगळी दादांच्या कार्यकाळातील आहेत. त्यात जळगाव शहर महापालिकेची सतरा मजली इमारत, वाघूर पाणीपुरवठा योजना तसेच विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलांचा प्राधान्याने उल्लेख करता येईल. सुरेशदादांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली नव्हती तोपर्यंत त्यांना निवडणुकीत हरविणे कोणत्याच पक्षाला शक्य झाले नव्हते. जळगाव घरकूल घोटाळ्यातील आरोपानंतर सुरेशदादा जळगावच्या राजकारणातून अचानक बाहेर फेकले गेले. त्याचाच फायदा घेऊन नंतर भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी जळगाव शहरात आपले बस्तान बसविण्याची संधी साधली.
जळगावच्या राजकारणात सुरेशदादांची एन्ट्री होण्याची पाहिली जाते वाट
यथावकाश जळगाव घरकूल घोटाळ्याचे काळ ढग निवळल्यानंतर सुरेशदादा हळूहळू जळगाव शहरात रूळण्याचा प्रयत्न आता करीत आहेत. अर्थात त्यांचे आता वय झाले असून, त्यांनी 80 वा वाढदिवस नुकताच साजरा सुद्धा केला आहे. त्यांचा एकूण अविर्भाव लक्षात घेता त्यांना आता जळगावच्या राजकारणात फार रस राहिला नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. पण का कोणास ठाऊक सुरेशदादाच फक्त अजुनही जळगावचा चेहरामोहरा बदलू शकतात तसेच जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवी दिशा देऊ शकतात, असे प्रत्येकाला कशासाठी वाटते आहे. सुरेशदादांनी प्रदीर्घ कालावधीनंतर जळगावमध्ये पहिल्यांदा पाय ठेवला तेव्हाही प्रसार माध्यमांनी त्यांना पहिला प्रश्न हाच विचारला होता, की दादा तुम्ही जळगावच्या राजकारणात सक्रीय कधी होत आहात म्हणून. अर्थातच दादांनी मला आता राजकारणात रस राहिला नसल्याचे एका झटक्यात सांगून टाकले. पत्रकारांचा दादांसाठी ठरलेला दुसरा प्रश्न असतो, तुम्ही शिवसेनेत उद्धव ठाकरे गटाच्या बाजुने आहेत एकनाथ शिंदे गटाच्या बाजुने. आणखी तिसरा प्रश्न असतो तुमचा राजकीय वारसदार कोण आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे देताना सुरेशदादा प्रत्येकवेळी थोडी सावध भूमिका घेताना दिसतात. प्रसंगी बाळसाहेब ठाकरेंनी उभ्या केलेल्या शिवसेनेचे असे दोन तुकडे झाल्याबद्दल दुःख देखील व्यक्त करतात.
मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील अजुनही आहेत दादांचे फॅन
सुरेशदादांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी जिल्ह्यातील काही मातब्बरांनी कधीकाळी जीवाचे रान केले होते. त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आल्याने सुरेशदादांना कधी नाही ते जळगावमध्ये पराभवाचे तोंडही पाहावे लागले होते. किंबहुना जळगावच्या राजकारणात त्यांचा नामोनिशाणच शिल्लक राहिला नव्हता. पण नियतीने आज आता अशी वेळ आणली आहे की सुरेशदादांचे जळगावकरांच्या मनावरील गारूड थोडेही कमी झाले नसल्याची प्रचिती पावलो पावली येत आहे. ते सध्या कोणत्याच पक्षाचे काम करीत नसले तरी त्यांची भेट घेण्यासाठी सामान्य नागरिक तसेच राज्याच्या राजकारणातील अनेक मंत्री व नेते आतूर असल्याचे दिसून येते. भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे खुद्द सुरेशदादांचे अजुनही फॅन आहेत. आपण आजही सुरेशदादांचे मार्गदर्शन घेतो, असे ते जाहिरपणे सांगतात. जळगावचे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील हे सुद्धा सुरेशदादांचे मोठे समर्थक आहेत.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)