Jalgaon News : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी तरूणाची खड्ड्यातील पाण्यात अंघोळ

Jalgaon News : मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडणाऱ्या अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. बांधकाम विभागाने वाऱ्यावर सोडलेल्या या मार्गावरील मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चक्क अंघोळ करून एका तरूणाने मंगळवारी (ता.28) अनोखे आंदोलन केले. दरम्यान, रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी सदर युवकाची भेट घेऊन रस्त्याचे काम लवकर सुरू होणार असल्याचे सांगून समजूत काढली.

A young man bathes in the water of a pit to draw attention to the Ankleshwar-Barhanpur road

अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर या रस्त्याचे महामार्गात रूपांतर करून रूंदीकरण केले जाणार असल्याच्या चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहेत. प्रत्यक्षात या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी आजतागायत कोणतीच हालचाल झालेली नाही. उलट सद्यःस्थितीत आहे तो रस्ता इतका खराब झाला आहे, की त्यावरील मोठ्या खड्ड्यांमधून दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे मुश्किल झाले आहे. खड्ड्यांमुळे लहान व मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडले असून, खड्डे बुजविण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नसल्याने रस्त्याने वापरताना वाहने पंक्चर होण्यासह घसरण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ही स्थिती लक्षात घेता बुधगाव (ता.चोपडा) येथील उर्वेश साळुंखे या तरूणाने रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्याच्या डबक्यात बसून अंघोळ करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा अनोखा प्रयत्न केला. सकाळी 11.45 वाजेपासून दुपारी साधारण 3.00 वाजेपर्यंत उर्वेश पाण्याच्या डबक्यातच बसून राहिला. अखेर साडेतीन तासानंतर रावेरच्या खासदार रक्षा खडसे घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर रस्त्याचे काम लवकर चालू होईल, असे आश्वासन उर्वेश साळुंखे यास देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली. उर्वेशच्या या आंदोलनाला परिसरातील नागरिकांनीही पाठिंबा दिला. दरम्यान, उर्वेशने रस्त्यावरील खड्ड्यात केलेल्या आंदोलनामुळे वाहनधारकांची चांगलीच भंबेरी उडाली.

WhatsApp Group
Previous articleAgriculture News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 441 कोटींचा निधी मंजूर
Next articleWheather Update : राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा येलो अलर्ट कायम