Weather Update : हवामान विभागाने गुरुवारी (ता. 30) राज्यातील जळगावसह नाशिक जिल्ह्यात तसेच मराठवाडा व विदर्भात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार बहुतांश सर्व जिल्ह्यात सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, आज शुक्रवारी (ता. 01 डिसेंबर) देखील जळगावसह राज्याच्या काही जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Thunderstorm warning again today in 7 districts of the state including Jalgaon
अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थितीत कायम असल्याने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. वास्तविक हवामान विभागाने बुधवारपासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळण्याची शक्यता व्यक्त केली होती. प्रत्यक्षात अवकाळी पाऊस थांबायचे नावच घेत नसल्याने रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भितीने शेतकरी चिंताग्रस्त होऊन बसले आहेत. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस कोसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. संपूर्ण पावसाळ्यात कोसळला नाही, असा पाऊस त्यादिवशी कोसळला. शिवारातील रब्बी दादर ज्वारीचे पीक त्यामुळे आडवे पडले असून, वेचणीवर आलेला कापूस देखील पावसात भिजला आहे.
आज शुक्रवारी या जिल्ह्यात वादळी पाऊस पडण्याचा इशारा
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज शुक्रवारी सुद्धा खान्देशातील जळगाव जिल्हा तसेच लगतच्या नाशिक जिल्ह्यात, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा धास्तावला आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)