गायीच्या 3.2 फॅट / 8.3 टक्के एसएनएफ दुधाच्या खरेदीचे नवीन धोरण लागू

Cow Milk Rate : गायीच्या दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने राज्यातील दुग्ध उत्पादकांनी काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे. राज्य शासन परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललेली असताना, दुधाच्या दरावर तोडगा काढण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यात आता गायीच्या 3.2 फॅट / 8.3 टक्के एसएनएफ दुधाच्या खरेदीचे नवीन धोरण अंमलात आणण्यात आले आहे. त्यास खासगी व सहकारी दूध संघ किती गांभीर्याने घेतात त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

New policy for procurement of 3.2 fat / 8.3 percent SNF cow’s milk implemented

अन्न सुरक्षा व मानक (अन्न पदार्थ मानक आणि संमिश्रे) अधिसूचनेतील उपनियमानुसार वेगवेगळ्या वर्गवारीच्या दुधातील किमान स्निग्धांश (फॅट) व किमान घन पदार्थ (एनएनएफ) निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विकास विभागाने शासन निर्णयान्वये संपूर्ण महाराष्ट्रात संकलित होणाऱ्या विविध वर्गवारीच्या दुधातील किमान स्निग्धांश व किमान घन पदार्थासाठी नवीन मानके निश्चित केली आहेत. त्यानुसार गायीच्या दुधासाठी 3.2 फॅट / 8.3 टक्के एसएनएफ दर्जाचे मानक निश्चित केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांना यापुढे गायीचे 3.2 फॅट / 8.3 टक्के एसएनएफ दर्जाचे दूध खरेदी करावे लागणार आहे. शासनाकडून म्हशीच्या दुधासाठी असलेल्या 6.0 फॅट / 9.0 टक्के एसएएफ दुधाच्या मानकात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. शेळी व मेंढीच्या दुधासाठी देखील 3.5 फॅट / 9.0 टक्के एसएनएफचा मानक कायम ठेवण्यात आला आहे.

दूध खरेदीदराबाबत स्पष्टता नाहीच

दूध खरेदीदराच्या तिढ्यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलेल्या शासनाने गायीच्या दुधाचे सुधारीत मानक निश्चित करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न तेवढा केला आहे. कारण, गायीच्या 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ दर्जाच्या दुधाला राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी किती खरेदीदर द्यायला पाहिजे, याबाबत शासनाच्या नवीन धोरणात कुठेच स्पष्टता दिसून आलेली नाही. अशा स्थितीत गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ दर्जाच्या दुधाला सध्या 27 रूपये प्रतिलिटरचा दर देणारे सहकारी व खासगी संघ आता गायीच्या 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ दुधाला किती दर त्याकडे पशुपालकांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group
Previous articleबचतगटाच्या महिलांना शेती उपयोगी ड्रोनसाठी 8 लाख रूपयांचे अनुदान
Next articleमुंबई बाजार समितीत केळीला शुक्रवारी (ता.1 डिसेंबर) मिळाला 3500 रूपये प्रतिक्विंटल भाव