तरूणांमध्येच शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद : कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम

Jalgaon Agri News : शेतकऱ्यांनी शेतीत कृषी संलग्न व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा तसेच तरूणांनी शेतीकडे उद्योग, व्यवसाय म्हणून पाहावे. शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची खरी ताकद तरूणांमध्येच आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी येथे शुक्रवारी (ता.1 डिसेंबर) केले.

Youth has the power to transform the agricultural sector: Commissioner Dr. Pravin Gedam

जळगाव तालुक्यातील शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींच्या प्रक्षेत्रांना कृषी आयुक्त श्री.गेडाम यांनी शुक्रवारी भेटी दिल्या. सावखेडा खुर्द शिवारातील श्रीमती सुशिलाबाई आत्माराम साळुंखे यांच्या शेतातील निर्यातक्षम केळी उत्पादन तसेच बी.आय. (बड इंजेक्शन) तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन केलेल्या केळी बागेला भेट देऊन तांत्रिक व कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी जाणून घेतली. याशिवाय करंज शिवारातील धोंडीराम सपकाळे यांनी लागवड केलेल्या नवीन कांदे बाग प्रक्षेत्रास भेट देऊन टिश्यूकल्चर तंत्रज्ञान व पारंपारिक कंद लागवडीमुळे केळी उत्पन्नात होत असलेले फरक, वेळेची बचत आदी बाबतही त्यांनी चर्चा केली. तसेच कानळदा येथे कृषी यांत्रिकीकरण उपभियान योजने अंतर्गत श्रीमती आशाताई अशोक राणे यांनी खरेदी केलेल्या हार्वेस्टर यंत्राची पाहणी करून माहिती जाणून घेतली. याच ठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत गोपाल सपकाळे यांनी उभारलेल्या सद्गुरु केळी प्रक्रिया उद्योगाला भेट देऊन कृषी आयुक्त श्री.गेडाम यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी, तंत्र अधिकारी दिपक ठाकुर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे, मंडळ कृषी अधिकारी अमित भामरे, कृषी पर्यवेक्षक डी.डी.सोनवणे,योगेश अत्रे, राहुल साळुंखे, प्रविण सोनवणे, भरत पाटील, कमलेश पवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोनू कापसे, विवेक चव्हाण व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्तांनी शेतकऱ्यांसोबतही केली शेतीविषयक चर्चा

यावेळी उपस्थित असलेल्या युवा शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना युवकांनी कृषी संलग्न व्यवसायासोबतच अन्न प्रक्रिया उद्योग व कृषी निर्यातीत आपले भवितव्य घडवल्यास शेती क्षेत्रात निश्चितचपणे परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना आयुक्तांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना व्यक्त केली. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी युवकांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

WhatsApp Group
Previous articleमुंबई बाजार समितीत केळीला शुक्रवारी (ता.1 डिसेंबर) मिळाला 3500 रूपये प्रतिक्विंटल भाव
Next articleउद्या शनिवारी (ता. 02 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव