खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावत असलेल्या अवकाळी पावसाने राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आता विश्रांती घेतली आहे. मात्र, खान्देशात तसेच लगतच्या नाशिकमध्ये अजुनही अवकाळीचे काळे ढग डोकावत आहेत. हवामान विभागाने आज शनिवारी (ता.2) देखील जळगावसह धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Chance of rain today in Jalgaon, Dhule, Nandurbar districts of Khandesh

ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याच्या स्थितीत थेट मध्यप्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम वाढल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाने शुक्रवार (ता.1) साठीही जळगावसह राज्यातील सात जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. प्रत्यक्षात पावसाला पोषक स्थिती निर्माण न झाल्याने तुरळक ठिकाणीच पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडलेला असताना, आज शनिवारी (ता.2) पुन्हा खासकरून खान्देश व लगतच्या नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे कपाशीसह मका, कांदा व रब्बी पिकांचे बऱ्याचअंशी नुकसान झाले असले तरी कोरडवाहू शेतीत घेतल्या जाणाऱ्या दादर ज्वारीसह हरभरा सारख्या पिकांना या पावसामुळे मोठे जीवदान मिळाले आहे. तूर पिकालाही अवकाळीमुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावसाळी वातावरण कायम असल्याने उकाडा वाढल्याच्या स्थितीत थंडी अचानक गायब झाली आहे. त्यामुळे पावसाची उघडीप मिळताच पुन्हा थंडी परतण्याची आशा शेतकरी बाळगून आहेत.

WhatsApp Group
Previous articleउद्या शनिवारी (ता. 02 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleहवामान तज्ज्ञ म्हणतात…यंदाच्या हिवाळ्यात भरणार नाही हुडहुडी