NCP Demand : कर्नाटक सरकार तेथील दुध उत्पादकांना 5 रु प्रतिलिटर अनुदान देते पण महाराष्ट्रातील आपल्या शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान दिले जात नाही. अमुलचे दुध विकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे तसेच कर्नाटकचे नंदिनी दूध विकण्याची व्यवस्था आहे. पण महाराष्ट्रात आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला भाव दिला जात नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
Govt should give Rs 5 per liter subsidy to milk, NCP demands
महाराष्ट्र राज्यात गायीच्या दुधाला 27 रुपये प्रतिलिटरचा भाव दिला जात असतांना पशुपालकांनी महागाईच्या या काळात जगायचे तरी कसे, असाही प्रश्न राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्यानंतर उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याच्या दूध धोरणाबद्दल शासनावर टिकास्त्र सोडले. प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील पुढे म्हणाले, की शेतकरी दारात आल्याशिवाय त्याला काहीच द्यायचे नाही, हे सरकारचे धोरण आहे. म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मागणी केल्यानंतर फक्त राज्यातील काही भागातच या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. आज सकाळी मी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होतो. त्यावेळी शेतकरी कुऱ्हाडीने द्राक्षाची बाग तोडत होता. तीन-साडे तीन लाख खर्च करून जर एक रुपयाही मिळणार नसेल तर काय फायदा असे त्या शेतकऱ्याचे म्हणणे होते. ही या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. या परिस्थितीत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे धोरण आखले पाहिजे. परंतु, या सरकारने अर्धवट दुष्काळ जाहीर केला आहे. काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असे सरकार म्हणतंय. जिथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे तिथे शेतकऱ्यांना वीजबिल माफ केले जाणार का? विद्यार्थ्यांना फी माफ केली जाणार का? सरकारने कोणत्याही नियम व अटी न ठेवता सरसकट दुष्काळ जाहीर करावा व सर्वांना सर्व सवलती द्याव्यात, ही आमची मागणी आहे.
पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक
कांदा उत्पादक शेतकरी या भागाचा महत्त्वाचा घटक आहे. पण याच कांद्यावर सरकारने 40% निर्यात शुल्क लावले आहे. कांदा बाहेर पाठवता येत नाही आणि त्यामुळे कांदा इथेच सडतो आहे. पिकविमा कंपन्या काहीही कारणे सांगून परतावा देत नाही. महाराष्ट्रात फसव्या पिकविम्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. कृषिमंत्री म्हणाले होते की, दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळेल. शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर दिवाळी साजरी करणार नाही. यांची दिवाळी जोरात झाली पण आमच्या बळीराजाला पैसे मिळाले नाही. त्यामुळे या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही, असाही घणाघात जयंत पाटील यांनी केला.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)