Central Railway : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील अंतर कमी करणाऱ्या प्रस्तावित वर्धा ते नांदेड (व्हाया यवतमाळ-पुसद) रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सुमारे 3445 कोटी रूपये खर्चून आकारास येणाऱ्या या नवीन रेल्वेमार्गाची लांबी 284 किलोमीटर इतकी असून, आतापर्यंत त्याचे 47 टक्के काम पूर्ण झाले आहे.
Wardha to Nanded railway work in progress; Vidarbha-Marathwada gap will reduce
वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना प्रामुख्याने फायदा होऊ शकणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 10 तासांचा फेऱ्यांचा प्रवास अवघ्या 4 तासांवर येऊ शकणार आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. या नवीन प्रकल्पावरील जवळपास 60 टक्के खर्च रेल्वेने तर 40 टक्के खर्च राज्य शासनाने उचलला आहे. संपूर्ण मार्गावर एकूण 27 स्थानके तयार केली जाणार आहेत. सुमारे 3445.48 कोटी रूपये निधी या मार्गासाठी आधीच मंजूर झालेला आहे, त्यापैकी 1910.07 कोटी रूपयांचा निधी आतापर्यंत एकूण प्रकल्पावर खर्च झालेला आहे. त्यातून रेल्वे मार्गाचे साधारण 47 टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 2138 हेक्टर जमिनीची आवश्यता असताना, त्यापैकी 1911 हेक्टर (89 टक्के) जमिनीची संपादन प्रक्रिया पार पडली आहे. प्रस्तावित वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गावरील 87.54 Lcum (44 टक्के) मातीकाम पूर्ण झाले आहे. 284.60 किलोमीटर अंतरापैकी 40 किलोमीटर मार्गाची निर्मिती देखील झाली आहे. संपूर्ण मार्गावरील 80 मोठ्या पुलांपैकी 32 पुलांचे काम झाले आहे, तर 320 लहान पुलांपैकी 50 पुलांचे काम पूर्ण झाले आहे. 43 उड्डाणपुलांची आणि 19 अंडरपासची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. 27 पैकी 3 रेल्वे स्थानकांच्या इमारतींचे बांधकाम सुद्धा पूर्णत्वास आले आहे. आठ किलोमीटर लांबीच्या सहा बोगद्यांचे कामही सध्या वेगाने सुरू आहे. 284.60 किलोमीटर अंतरापैकी 28 किलोमीटर लांबीच्या अंतराची ट्रॅक लिंकिंगही पूर्ण झाली आहे. कामाची गती लक्षात घेता प्रस्तावित वर्धा ते नांदेड रेल्वेमार्ग लवकर पूर्ण होण्याची आशा विदर्भ व मराठवाड्यातील प्रवाशी नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.