Agricultural News : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि सततचे ढगाळ हवामान आता थोडेफार निवळले आहे. मात्र, पावसाळी वातावरण निवळल्यानंतर दव आणि धुक्याचे प्रमाण वाढल्यामुळे राज्यातील द्राक्ष, केळीच्या बागा तसेच आंबा, हरभरा पिकांवर बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी एका संकटातून बाहेर पडत नाही तेवढ्यात दुसऱ्या संकटात अडकताना दिसत आहे.
Monsoon cleared, fog caused fungal diseases on crops
नाशिकसह अन्य जिल्ह्यातील द्राक्ष बागा अवकाळी पावसानंतर एखाद्या आजारी रूग्णांप्रमाणे पिंगट, निस्तेज पडल्या आहेत. द्राक्ष बागांची कोणतीही वाढ अशा प्रतिकूल परिस्थितीत होताना दिसत नसून, द्राक्ष मण्यांची आकारवाढ सुद्धा थांबली आहे. काही ठिकाणी दव आणि धुक्यामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव वाढल्याची लक्षणे दिसून आली आहेत. जास्त पावसामुळे मुळ्यांना खेळती हवा मिळणे मुश्किल झाले असून, सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबल्याने द्राक्षबागांची अवस्था खूपच नाजूक झाली आहे.
हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव
रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या हरभरा पिकावरही अवकाळी पाऊस व सततच्या आभ्राच्छादित वातावरणामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेले हरभऱ्याचे पीक वाढीसह फुलोरा अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने जमिनीत अतिरिक्त ओलावा तयार होऊन हरभऱ्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास आयती संधी मिळाली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याचे पीक पिवळे देखील पडले आहे. पोषक वातावरणाची निर्मिती झाल्याच्या स्थितीत घाटे अळीने तोंड वर काढले आहे. कोवळी पाने तसेच फुले खाऊन हरभरा पिकाचे मोठे नुकसान करणाऱ्या घाटे अळीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आंब्याच्या झाडांची मोहोर गळ थांबेना
हिवाळ्याची सुरूवात झाल्यानंतर आंब्याला चांगला मोहोर येण्यास सुरूवात झाली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे थंडीच गायब झाल्याने बऱ्याच ठिकाणी आंब्याला मोहोर येण्याची क्रिया आता थांबली आहे. शिवाय जेवढा काही मोहोर आला होता, त्यापैकी बराच मोहोर सततच्या ढगाळ वातावरणामुळे कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आता गळून पडला आहे. संबंधित सर्व शेतकरी मोहोर गळ थांबविण्यासाठी बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत असले तरी वातावरण निरभ्र होत नाही तोपर्यंत काही उपयोग होईल असे दिसत नाही. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)