Ministry of Agriculture : नरेंद्रसिंह तोमर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या केंद्रिय कृषीमंत्री पदावर आता झारखंडचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रिय आदिवासी विकास मंत्री अर्जून मुंडा यांना संधी देण्यात आली आहे. त्यानुसार श्री. मुंडा यांनी शुक्रवारी (ता.08) कृषीमंत्री पदाचा कार्यभार देखील स्वीकारला आहे.
Former Jharkhand Chief Minister Arjun Munda is now the new Union Agriculture Minister
विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर तसेच जलशक्ती व खाद्य संस्करण विभागाचे राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुका सिंह आदींनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे दोन दिवसांपूर्वीच सोपवला होता. राष्ट्रपती द्रोपदी मु्र्मू यांनी तिन्ही मंत्र्यांचे राजीनामे मंजूर केल्यानंतर आज शुक्रवारी राजीनामे दिलेल्या मंत्र्यांच्या जागेवर नवीन मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यात अर्जून मुंडा यांचाही समावेश असून, त्यांना केंद्रिय कृषीमंत्री पदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. श्री.मुंडा यांना कृषीमंत्री पदाची जबाबदारी सोपवून भाजपाने आदिवासी चेहऱ्याला पुढे केले आहे. झारखंड मुक्ती मोर्चापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात करणारे अर्जून मुंडा हे सन 2000 मध्ये भाजपामध्ये सक्रीय झाले होते. वेगळे झारखंड राज्य अस्तित्वात आल्यानंतर बाबुराव मरांडी यांच्या सरकारमध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी देखील मिळाली होती. त्यानंतर अवघ्या तीनच वर्षात त्यांना वयाच्या 35 व्या वर्षी झारखंडचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेता आली. मुंडा हे त्यानंतर सन 2005 मध्ये दुसऱ्यांदा तसेच सन 2010 मध्ये तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान राहिले. सन 2019 मध्ये मात्र त्यांनी खुंटी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली आणि प्रचंड मतांनी विजयी होऊन आदिवासी विकास मंत्री बनण्याचा मान त्यांनी पटकावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू गोटातील एक सदस्य मानले जाणारे अर्जून मुंडा यांनी आतापर्यंत विविध पदांवर प्रामाणिकपणे काम करून पक्षाचा विश्वास सार्थ ठरविला आहे. त्यामुळेच त्यांच्या खांद्यावर देशाच्या कृषी मंत्रालयाचा भार आता टाकण्यात आला आहे.