केंद्राने निर्यातबंदी 31 मार्चपर्यंत वाढविल्याने राज्यात कांद्याचा झाला वांदा

Onion Export Ban : कांद्याचे भाव दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे कारण देऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कांदा निर्यातबंदी 31 मार्च 2024 पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.08) घेतला. दरम्यान, केंद्राच्या निर्णयाची माहिती मिळताच राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याचे भाव सुमारे 2 हजार रूपये प्रतिक्विंटलने कमी झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी लिलाव बंद पाडले, रास्तारोको आंदोलनही केले.

The central government has extended the export ban on onion till March 31, 2024

विविध कारणांनी कांद्याचे उत्पादन पर्यायाने बाजार समित्यांमधील नियमित आवक घटल्यानंतर कांद्याचे भाव काही महिन्यांपासून 4 हजार रूपये प्रतिक्विंटलच्या पुढे गेले आहेत. किरकोळ बाजारात तर कांदा 50 ते 60 रूपये किलोच्या भावाने विकला जातो आहे. ही स्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने आज शुक्रवारी तडकाफडकी निर्णय घेऊन कांद्यावर पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत निर्यातबंदी लादली आहे. देशासह राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना केंद्राच्या निर्णयाची माहिती देण्यात आल्यानंतर सकाळी लिलाव सुरू होताच कांद्याचे भाव जवळपास निम्म्याने कोसळले. अचानक कांद्याचे भाव खाली आल्याचे बघून संबंधित सर्व शेतकऱ्यांना मोठा धक्काच बसला. अनेक शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव तसेच पिंपळगावच्या बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन केले. केंद्र सरकारच्या निर्णयाचा सर्वांनी तीव्र निषेध केला. काही ठिकाणी महामार्गावर रास्तारोको आंदोलन देखील करण्यात आले. दरम्यान, कांद्यावरील निर्यातबंदीचे पडसाद विधीमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. विरोधी पक्षांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली.

WhatsApp Group
Previous articleझारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जून मुंडा आता देशाचे नवीन केंद्रिय कृषीमंत्री
Next articleजळगाव जिल्ह्यातील चोपड्यात 1 लाख 67 हजार रूपयांचा गुटखा जप्त