Assembly Winter Session : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला सुमारे 14 हजार रूपये प्रतिक्विंटलचा भाव देण्याच्या मागणीसाठी नागपूर येथील विधीमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केली. तसेच राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे विधीमंडळाचा परिसर चांगलाच दणाणून गेला.
14 thousand for cotton. Per quintal price must be achieved: demand of the opposition
‘अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त पंचनामे करणारे सरकार सूस्त’, ‘अवकाळीने पावसाने निघाले शेतकऱ्यांचे दिवाळे गद्दारांना लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहोळे’, ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा सागर सरकार मात्र देतेय नुसतेच गाजर’, यासह अनेक लक्षवेधी घोषणा महाविकास आघाडीने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून दिल्या. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले, अभिजित वंजारी, रवींद्र वायकर, सचिन अहिर आदींसह अन्य बऱ्याच आमदारांनी आंदोलनात सहभाग घेऊन राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अंबादास दानवे यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा यावेळी समाचार घेतला. सरकारचे आयातीसह व निर्यातीचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेली सुमारे 10 हजार कोटी रूपयांची घोषणाही खोटी असल्याची टीका श्री.दानवे यांनी केली. याशिवाय कापसाला 14 हजार रूपये प्रतिक्विंटल आणि धान व सोयाबीनला उत्पादनखर्चाचा विचार करून रास्त भाव देण्याची मागणी त्यांनी केली.