Onion Export Ban : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांदा निर्यातबंदीच्या विरोधात शड्डू ठोकल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने केंद्रिय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन त्यांना कांदा उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी साकडे घातले आहे. फडणवीसांनी त्यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर मंत्री श्री. गोयल यांनीही शेतकऱ्यांबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.
Devendra Fadnavis demands central government for onions
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या भेटीची सचित्र माहिती शेअर केली आहे. कांदा निर्यातबंदीच्या विरोधात संपूर्ण राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बऱ्याच ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. काही ठिकाणी रास्तारोको आंदोलने देखील झाली आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (ता.11) नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे होत असलेल्या कांदा उत्पादकांच्या आंदोलनात सहभागी होऊन कांदा निर्यातबंदीच्या विरोधात मैदानामध्ये उतरण्याची तयारी केली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही कांदा प्रश्नी गदारोळ झालेला आहे. त्यामुळे खळबळून उठलेल्या राज्य सरकारने कांदा प्रश्न सोडविण्यासाठी आता हालचाली गतीमान केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत केंद्रिय मंत्री पियूष गोयल यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. राज्यातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादकांच्या समस्यांवरही त्या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, कांदा निर्यातबंदीवरून राज्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन सोमवारी (ता.11) दिल्लीत केंद्रिय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या समवेत आणखी एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)