Solar System : अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा अधिक कार्यक्षम वापर करण्याच्या उद्देशाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा कार्यान्वित करण्याचा विचार शासन करीत आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये आगामी दोन महिन्यात सोलर सिस्टीम बसविण्यासाठी तातडीने हालचाल केली जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.
Solar system will be installed in schools in Jalgaon district in two months: Minister Girish Mahajan
भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांनी जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सोलर यंत्रणा बसविण्याबाबतचा प्रलंबित विषय केव्हा मार्गी लावणार आहात, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना ग्रामविकास श्री.महाजन यांनी राज्यासह जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सौर उर्जेच्या वापराबाबत शासन गांभीर्याने विचार करीत असल्याचे सांगितले. विधीमंडळाचे सदस्य प्रकाश आबिटकर, प्राजक्त तनपुरे आणि यशोमती ठाकूर यांनीही जिल्हा परिषद शाळांमधील सौर उर्जेच्या वापराविषयी काही उपप्रश्न उपस्थित केले. मंत्री श्री.महाजन म्हणाले, की रावेर तालुक्यातील लालमाती येथे असलेल्या शासकीय आश्रमशाळेत शासनाने सन 2011 मध्ये सोलर सिस्टीम बसवून घेतली होती. मात्र, वादळी वाऱ्यांमुळे त्यापैकी काही युनिट आता नादुरूस्त झाले आहेत. त्यांची तातडीने दुरूस्ती करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तीन वर्षांपूर्वी देखील अपारंपरिक उर्जा विकास योजनेतून रावेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 17 शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसविण्यात आली होती. त्याधर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अन्य शाळांमध्येही सौर यंत्रणा तातडीने कार्यान्वित केली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांनी दिली.