Chief Minister’s Employment Generation Programme : राज्य शासन शहरी व ग्रामीण युवक युवतींची वाढती संख्या व उद्योग , व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकांना चालना देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम नावाची योजना राबवित आहे. त्याअंतर्गत 10 ते 50 लाखांचे कर्ज हवे असल्यास अर्ज करण्याचे आवाहन जळगाव येथील जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी केले आहे.
Take advantage of Chief Minister’s Employment Generation Programme and get a loan of 50 lakhs
पात्र उत्पादन व सेवा उद्योग व्यवसायासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम नावाची योजना राबविण्यात येते. योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण अधिकतम 45 वर्ष (अनु.जाती/जमाती/महिला/विमुक्त भटक्या जाती/जमाती/अपंग/अल्पसंख्याक/माजी सैनिक यांचेसाठी 5 वर्ष शिथील) पात्र राहतील. योजनेसाठी शैक्षणिक पात्रता ही 10 लाखांच्या प्रकल्पासाठी इयत्ता 7 वी उत्तीर्ण आहे. 25 लाखांवरील प्रकल्पासाठी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाचे कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वंयरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अशा प्रकारे मिळेल योजनेतून लाभ
या योजनेमध्ये उत्पादन व्यवसायासाठी (उदा. बेकरी उत्पादन, पशुखाद्य निर्मिती, फॅब्रिकेशन इत्यादी) 50 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. सेवा व्यवसायासाठी (सलुन, हॉटेल, दुरुस्ती सेंटर इत्यादी) 20 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. या योजनेत अनुसूचित जाती- जमाती, महिला, विमुक्त भटक्या जाती, जमाती, दिव्यांग, अल्पसंख्याक, माजी सैनिक या प्रवर्गातील शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किमतीच्या 25 टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान पात्र असेल. त्यासाठी अर्जदाराला स्व गुंतवणूक 5 टक्के करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गासाठी अर्जदार हा शहरी असेल तर 15 टक्के व ग्रामीण असेल तर 25 टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थीना 10 टक्के स्व गुंतवणूक करावी लागेल. लाभ घेण्यासाठी अर्जदाराने https://maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना अर्जदारास स्वतःचा पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रहिवास दाखला/शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला, मार्कशीट, पॅन कार्ड, प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, दिव्यांग दाखला तसेच वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन पुर्ण भरलेले हमीपत्र (undertaking form) ही कागदपत्रे अपलोड upload करावी लागतात.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती ज्यांना नवीन उद्योग/व्यवसाय सुरु करावयाचा असेल त्यांनी वरील वेबसाईटवर अर्ज ऑनलाईन करावा. या योजनेबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालय, शासकीय आयटीआयजवळ, जळगांव येथे कार्यालयीन वेळेत भेट द्यावी, असेही आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे. (Tel No. 0257- 2252832 Email – didic.jalgaon@maharashtra.gov.in)