मुंबई बाजार समितीत केळीची आवक घटली, भाव मात्र स्थिर

Banana Market Rate : मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन-चार दिवसांपासून कच्च्या केळीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परंतु, मागणीचा रेटा कमी असल्याने सध्या जेवढी काही केळीची आवक बाजार समितीत होत आहे, तिचे भाव स्थिरच आहेत. केळीच्या भावात कोणतीच सुधारणा किंवा घसरण झालेली नाही.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई बाजार समितीत साधारणपणे 13 डिसेंबरपासून केळीच्या आवकेत सातत्याने घट झालेली आहे. अपवाद वगळता गेल्या सप्ताहात केळीची दैनंदिन आवक 100 क्विंटलपेक्षा जास्त झालेली नाही. गुरुवारी (ता. 21 डिसेंबर) तर जेमतेम 11 क्विंटलपर्यंतच केळी बाजार समितीत दाखल झाली होती. केळीची ही आवक सप्ताहातील निच्चांकी आवक होती. दरम्यान, आवक मोठ्या प्रमाणात कमी होऊनही केळीच्या भावात कोणतीच तेजी गेल्या तीन दिवसात निर्माण दिसून आलेली नाही. 18 डिसेंबरला मुंबईत केळीची सुमारे 177 क्विंटल आवक झाली होती. त्यानंतर सातत्याने आवकेत घट होताना दिसून येत आहे. वास्तविक दिवाळी व छटपुजेनंतर कमी झालेली केळीची मागणी मार्गशिर्ष महिन्यातील उपवासांमुळे वाढायला पाहिजे होती. प्रत्यक्षात मागणीत कोणतीही वाढ झालेली नसल्याने केळीचे भाव गेल्या चार दिवसांपासून 1400 ते 1800, सरासरी 1700 रूपये प्रतिक्विंटल दरम्यान स्थिर आहेत. पाच दिवसांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबरला मुंबईत केळीला सुमारे 2400 ते 2800 रूपये प्रतिक्विंटल भाव होता.

दृष्टीक्षेपात मुंबईतील केळीचे भाव (प्रतिक्विंटल)
● 21 डिसेंबर- 1400 ते 2000 रूपये
● 20 डिसेंबर- 1400 ते 2000 रूपये
● 19 डिसेंबर- 1400 ते 2000 रूपये
● 18 डिसेंबर- 1400 ते 2000 रूपये
● 16 डिसेंबर- 2400 ते 2800 रूपये

WhatsApp Group
Previous articleविदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरात थंडीचा कडाका वाढला
Next articleऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी जळगाव जिल्ह्यात सुरू होणार शासकीय वसतिगृह