जळगावच्या जैन हिल्सवर राष्ट्रीय शेतकरी दिनी भरला जगाच्या पोशिंद्यांचा मेळा

Jain Irrigation Agriculture Festival : जळगावच्या जैन हिल्सवर सध्या हायटेक शेतीचा नवा हुंकार, या संकल्पनेंतर्गत कृषी महोत्सव सुरू आहे. त्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच लगतच्या मध्यप्रदेशातून हजारो शेतकरी दररोज भेट देत आहेत आणि आपली तंत्रज्ञानाची भूक भागवताना दिसत आहेत. शनिवारी (ता.23) तर राष्ट्रीय शेतकरी दिन होता. यादिवशी जगाच्या पोशिंद्यांचा मोठा मेळा जैन हिल्सवर भरला होता.

शेतीत कोणते पीक घ्यावे तसेच कोणती जात लावावी, अशी माहिती कृषी प्रदर्शनांमध्ये समजते. मात्र, शेती कशी करावी आणि त्यातील पिकांची जोपसना कशाप्रकारे केली पाहिजे, त्यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयुक्त आहे, याची माहिती प्रदर्शनांमध्ये मिळत नाही. ही स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांमधील तंत्रज्ञानाची भूक शमविण्यासाठी जळगावच्या जैन इरिगेशनने यंदा पहिल्यांदा पिकांचा लाईव्ह डेमो दाखविणारा कृषी महोत्सव जैन हिल्सवर आयोजित केला आहे. अगदी भाजीपाल्यापासून ते हळद, आले व बहुवार्षिक फळझाडे, कपाशी, केळी, ऊस आदी बऱ्याच पिकांचे प्रात्यक्षिक प्लाॅट त्याठिकाणी जैन इरिगेशनने मोठ्या मेहनतीने उभारले आहेत. याशिवाय बागायती शेतीसाठी उपयोगी पडणारी सिंचन प्रणाली, लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कृषी अवजारे यांचे प्रदर्शन त्यानिमित्ताने भरविले आहे. जे शेतकऱ्यांना याची देही याची डोळा बघण्याचे भाग्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने मिळाले आहे. महोत्सवाला भेट देणारा प्रत्येक शेतकरी जैन हिल्सवरील निसर्गरम्य वातावरणात अक्षरशः देहभान विसरून जातो. पारंपरिक शेतीत कधी वापरले नाही, असे तंत्रज्ञान भरल्या डोळ्यांनी पाहुन तृप्त होतो. शेतकऱ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी जैन इरिगेशनची तज्ज्ञ मंडळी उपस्थित असतातच. शिवार फेरीनंतर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन तृप्तीचा ढेकर देणारे शेतकरी जैन इरिगेशनच्या आदारतिथ्याने नक्कीच भारावतात.

दोन राज्याच्या शेतकऱ्यांमध्ये विचारांचे आदानप्रदान
जैन हिल्सवरील कृषी महोत्सवात महाराष्ट्रासह लगतच्या मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांची दररोज लक्षणीय उपस्थिती असते. महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दोन राज्यांच्या शेतकऱ्यांमध्ये विचारांचे चांगले आदानप्रदान त्यानिमित्ताने होते. त्या-त्या भागातील पीक पद्धतीविषयी देखील हे शेतकरी एकमेकांशी चर्चा विनिमय करीत असल्याचे दिसून येते. जैन हिल्सवरील कृषी महोत्सव जणू त्यांच्यामधील संवादाचा सेतू बनला आहे.

WhatsApp Group
Previous articleजळगावमध्ये निच्चांकी 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, उर्वरित राज्यात थंडीचे प्रमाण सर्वसाधारण
Next articleजाणून घ्या, राज्यात कसे आहेत सध्या कापसाचे बाजारभाव ?