A Different Village : वाढत्या भारनियमनासह आवाक्याबाहेरील वीज बिलामुळे त्रस्त झालेले शेतकरी आपण नेहमीच पाहतो. शेतकरी आणि वीज वितरण कंपनीमध्ये त्यामुळे बऱ्याचवेळा वादाचे प्रसंग देखील उद्धभवतात. मात्र, सोलापूर जिल्ह्यात एक असे गाव आहे ज्याठिकाणचे शेतकरी विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी 100 टक्के सोलर पंपांचा वापर गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत. आज आपण त्या गावाची माहिती घेणार आहोत.
A Different village in Solapur district farming on 100 percent solar pump
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात टेंभूर्णीजवळ वसलेल्या बेंबळे या गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या क्रांतीची माहिती घेत असताना, अतिशय रंजक घटनाक्रम समोर आला. झाले असे की बेंबळे गावातील बहुतांश शेतकरी पूर्वी पावसाच्या भरवाशावर कोरडवाहू शेती करायचे. त्यातून फार काही उत्पन्न हाती येत नसल्याने तेथील शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच बेताची होती. कालांतराने काही शेतकऱ्यांनी विहीर खोदून कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली. हळूहळू सर्व शेतकरी नंतर कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्यासाठी सरसावले. त्यामुळे बेंबळे गावाचे सुमारे 2600 हेक्टर शेतीक्षेत्र कायम सिंचनाखाली देखील आले. मात्र, नंतर वीजेच्या समस्येला तोंड देण्याची वेळ संबंधित सर्व शेतकऱ्यांवर आली. पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने सर्वच शेतकरी हैराण झाले. पाणी असताना फक्त पुरेशी वीज नाही म्हणून अनेकांची पिके हातची वाया गेली. विजेची समस्या कायमची सोडविण्यासाठी त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे दाद मागितली. सोलापूरचे तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडेही शेतकऱ्यांनी त्याबद्दल तक्रार केली. विजेचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी विचारांती सोलर पंप हाच एकमेव पर्याय असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बेंबळे गावासाठी सुमारे 100 सोलर पंप बसविण्यास तात्काळ मंजुरी दिली. तेव्हापासून आजतागायत बेंबळे गावचे शेतकरी फक्त आणि फक्त सोलर पंपांच्या सहाय्याने पाणी उपसा करून बागायती पिके घेत आहेत. विजेची समस्या कायमची निकाली निघाल्याने विना व्यत्यय पंप सुरू राहून शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनातही त्यामुळे भरघोस वाढ झाली आहे.
आजच्या घडीला 426 सोलर पंप कार्यान्वित
बेंबळे गावातील सोलर पंप बसविण्याची मोहीम अजुनही थांबलेली नाही. त्यासाठी शासनाने तेथील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ देखील दिला आहे. आजच्या घडीला बेंबळे गावच्या शिवारात साडेसात एचपीचे 11 तसेच पाच एचपीचे 260 आणि तीन एचपी क्षमतेचे सुमारे 155 सोलर पंप कार्यान्वित आहेत. त्यामुळे बेंबळे गावाच्या शेतांमध्ये गेल्यानंतर जिकडे पाहावे तिकडे सोलर पंपासाठी वापरले जाणारे पॅनेल दिसून येतात. त्यासोबतच 24 तास सिंचनाची सोय झाल्याने बहरलेली पिके सुद्धा नजरेला पडतात.