Honey Festival : राज्यातील मधमाशी पालनासह मध उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच त्याबद्दल जनजागृती वाढविण्याकरीता देशात प्रथमच मध महोत्सवाचे आयोजन जानेवारीत करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या महोत्सवात मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीराचे स्वास्थ आणि मधाचा उपयोग, मध उत्पादकांचे अनुभव कथन असे कार्यक्रम देखील होणार आहेत.
Organizing honey festival in January to promote beekeeping
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 18 व 19 जानेवारीला आयोजित केल्या जाणाऱ्या मध महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार आहे. या महोत्सवात मध तसेच मेणापासून तयार करण्यात येणारी उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या मधपाळांचे 20 स्टाॅल असतील. राज्यातील मधक्रांतीची मुहुर्तमेढ यानिमित्ताने केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी दिली आहे.
मधमाशी पालनातून 4539 शेतकऱ्यांना सुमारे 239 लाखांची झाली कमाई
मधाची वाढती मागणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्यात मधमाशी पालनास खूप मोठा वाव आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मधाला सुमारे 500 रूपये प्रतिकिलोचा हमीभाव सुद्धा मिळतो. सध्या राज्यात 32 हजार पेट्यांच्या माध्यमातून मध संकलनाचे काम केले जाते. ज्यामुळे 1079 गावांमधील 4539 शेतकऱ्यांना शेतीशिवाय कमाईचे वेगळे साधन उपलब्ध झाले आहे. राज्यातील मधमाशी पालक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी सुमारे 60 हजार किलो मधाचे उत्पादन घेऊन सुमारे 239 लाखांची आर्थिक कमाई केली होती. मधमाशीपालनामुळे परागीभवनाद्वारे विविध पिकांच्या उत्पादनातही मोठी वाढ होत असते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ मधमाशीपालनाच्या माध्यमातून मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी मध केंद्र योजना तसेच मधाचे गाव, अशा काही योजना राबविते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मध, मेण, प्रोपोलिस, मधमाशांचे विष यांचीही खरेदी महामंडळामार्फत केली जाते.