नागपूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी 20 कोटींचा निधी

Orange Processing Center : सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खासगी उद्योजकांच्या माध्यमातून राज्यातील नागपूर, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात पाच ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने सुमारे 20 कोटी रूपयांचा निधी देखील मंजूर केला आहे.

20 crore fund for setting up orange processing center in Nagpur, Amravati, Buldhana district

महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती तसेच अकोला व बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संत्री उत्पादन घेतले जाते. मात्र, काढणीपश्चात संत्रा फळांचे सुमारे 25 ते 30 टक्के नुकसान होते. राज्यात संत्र्यावर प्रक्रिया करून त्यापासून दीर्घकाळ टिकणारे मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ही स्थिती लक्षात घेऊन संत्रा उत्पादकांना काढणीपश्चात प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील काटोल, नागपूर, कळमेश्वरला तसेच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे आधुनिक सुविधायुक्त संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी राज्य शासनामार्फत देण्यात येणारे अर्थसहाय्य हे अनुदान स्वरूपात असेल. लाभार्थींना प्रकल्प किंमतीच्या किमान 15 टक्के रक्कम स्वनिधी म्हणून खर्च करणे आवश्यक राहील. 85 टक्के अर्थसहाय्य बँकाकडून कर्ज स्वरूपात मंजूर करून घ्यावे लागेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून प्रकल्पाच्या अंदाजित किमतीच्या 50 टक्के मर्यादेपर्यंतचे अनुदान उपलब्ध होईल.

असे असेल संत्रा प्रक्रिया योजनेचे स्वरूप
■ शासनाने मान्यता दिलेल्या संत्रा प्रक्रिया केंद्र योजनेच्या माध्यमातून प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पांतर्गत 2000 चौरस फुटाचे छोटे पॅक हाऊस, 2.5 मेट्रीक टन प्रतिबॅच क्षमतेचे प्रिकुलिंग व 25 मेट्रीक टन क्षमतेचे शीतगृह तसेच 2.5 टन प्रतितास सेमी ऑटोमॅटिक क्षमतेचे ग्रेडिंग व वॅक्सींग लाईन यासाठी प्रति प्रकल्प सुमारे 4 कोटी रूपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य उपलब्ध केले जाईल.
■ दुय्यम प्रक्रिया प्रकल्पांतर्गत वार्षिक 150 टन क्षमतेचा संत्रा रेडी टू सर्व्ह प्रकल्प उभारण्यासाठी प्रति प्रकल्प 40 लाखांच्या मर्यादेत अर्थसहाय्य उपलब्ध केले जाईल. या प्रकल्पाची क्षमता मध्यम स्वरूपाची असेल.
■ उपपदार्थावरील प्रक्रिया प्रकल्पांतर्गत संत्र्यांच्या सालीपासून कोल्डप्रेस पद्धतीने तेल काढण्याच्या प्रकल्पाला 30 लाखांच्या मर्यादेत अर्थसहाय्य उपलब्ध केले जाईल. संत्र्याच्या उपपदार्थांवर प्रक्रिया करण्याच्या आधुनिक प्रकल्पाचा यात समावेश राहील.

WhatsApp Group
Previous articleमधमाशी पालनास चालना देण्यासाठी जानेवारीत मध महोत्सवाचे आयोजन
Next articleजळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना लवकरच येतील सोन्याचे दिवस