जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना लवकरच येतील सोन्याचे दिवस

Banana export opportunities : जगात भारत हा प्रमुख केळी उत्पादक देश असून, सध्या भारतातून आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात देखील केली जाते. आगामी काळात अमेरिका, रशिया, जपान, ब्रिटन, फ्रान्स, चीन, जर्मनी आदी देशांमध्ये सागरी मार्गाने केळीची निर्यात केंद्र सरकार वाढविणार आहे. त्यामाध्यमातून सुमारे एक अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 8,300 कोटी रूपये कमावण्याचा उद्देश सरकारचा आहे.

Banana growers of Jalgaon district will soon have golden days

क्षेत्र व उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने विचार केला तर जगातील केळीच्‍या एकूण उत्‍पादनात भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो. सद्यःस्थितीत भारतात सुमारे 2 लाख 20 हजार हेक्‍टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. त्यापैकी साधारण 45 हजार हेक्‍टर क्षेत्रावर केळीची लागवड आणि सुमारे 50 टक्‍के उत्‍पादन एकट्या महाराष्‍ट्रात होते. केळीचे निम्‍म्‍यापेक्षा अधिक क्षेत्र जळगाव जिल्‍हयातच असून, त्यामुळेच जळगाव जिल्‍हाला केळीचे आगर सुद्धा मानले जाते. केंद्र सरकारने केळी निर्यातीला चालना दिल्यानंतर त्याचा खूप मोठा फायदा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना आगामी काळात होऊ शकणार आहे.

विविध देशात केळीची निर्यात करण्याचा मास्टर प्लान
टिकवण क्षमता कमी असल्याचे लक्षात घेऊन भारतातून एरवी हवाई मार्गाने विदेशात केळी निर्यात केली जाते. त्यापुढे जाऊन सागरी मार्गाने केळी निर्यातीची शक्यता केंद्र सरकारने नुकतीच पडताळून पाहिली. त्यानुसार नेदरलँड देशाला सागरी मार्गाने केळीची पहिली खेप पाठविण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर केंद्राने आगामी पाच वर्षात सागरी मार्गाने विविध देशात केळीची निर्यात करण्याचा मास्टर प्लान तयार केला आहे. त्या प्रोटोकॉलमध्ये केळीसाठी सागरी मार्गाने निर्यात होत असताना प्रवासाचा एकूण वेळ समजून घेणे, ठराविक वेळी फळांची काढणी करणे, केळी पिकण्याच्या कालावधीचे मोजमाप करणे या गोष्टींचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी केळी उत्पादकांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे. अपेडाच्या माध्यमातून केळी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर भागधारकांना सोबत घेऊन अलिकडे प्रोटोकॉल देखील विकसित केले आहेत. केळीसोबत आंबा, डाळिंब, जॅकफ्रूट यासारख्या फळांची व भाजीपाला पिकांची सागरी मार्गाने निर्यात वाढविण्याकरीता सुद्धा अपेडा आता प्रोटोकॉल तयार करण्याचे काम करीत आहे. त्यात यश आल्यानंतर भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली फळे व भाजीपाल्याला चांगले मूल्य मिळण्याची शक्यता वाढली आहे.

WhatsApp Group
Previous articleनागपूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी 20 कोटींचा निधी
Next articleपुणे जिल्हा वगळता राज्याच्या इतर भागातील थंडीचा गारठा कमीच