साताऱ्यातील कारागृहात शेतकरी कैद्यांनी घाम गाळून फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

Different News : साताऱ्यातील जिल्हा कारागृहाच्या आवारात कैद्यांकडून एरवी नियमित भाजीपाला पिकांची शेती केली जात होती. त्यात बेरी, ब्रोकोली आदी काही पिकांचाही समावेश होता. त्यापुढे जाऊन बाजारात चांगली मागणी व भाव असलेल्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन आता कैद्यांच्या माध्यमातून घेतले जात आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे शेतीत घाम गाळणारे बहुतांश सर्व कैदी मूळचे शेतकरीच आहेत.

In the prison Satara, the farmer inmates flourished the strawberry farm

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. किंबहुना या भागातील स्ट्रॉबेरीला सर्वदूर मागणी देखील असते आणि त्याठिकाणी स्ट्रॉबेरीपासून जॅम तसेच जेली तयार करणारे प्रक्रिया उद्योग सुद्धा उभे राहिले आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन सातारा येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी कैद्यांच्या हातून स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा ध्यास घेतला. दोन महिन्यांपूर्वी कारागृहाच्या आवारात सुमारे 350 रोपांची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आली होती. त्या सर्व रोपांना योग्य ती देखभाल केल्यानंतर आता भरघोस स्ट्रॉबेरी लगडली आहे. सातारा जिल्ह्यातून विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जिल्हा कारागृहात आलेल्या शेतकरी कैद्यांच्या घामाला त्यामुळे एकप्रकारे चांगले फळ आले आहे.

कारागृहातील शेतीमुळे कैद्यांना मिळाली नवी दिशा
भाजीपाला पिकांसोबत बदलत्या काळानुसार शेतीचे नवे तंत्र कैद्यांना शिकविण्याच्या उद्देशाने स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग साताऱ्यातील कारागृहात करण्यात आला. त्यामुळे लागवडीपासून ते काढणीपर्यंत स्ट्रॉबेरीच्या पिकाची जोपासना कशी करतात, या पिकाला रासायनिक खतांची किती मात्रा द्यावी लागते, कीड व रोग नियंत्रणासाठी कोणते किटकनाशक फवारावे लागते, याबाबतचे मार्गदर्शनही कैद्यांना वेळोवेळी मिळाले. त्या ज्ञानाचा फायदा कैद्यांना कारागृहातून सुटका झाल्यावर नक्कीच होणार असून, स्वतःच्या शेतीत त्यांना स्ट्रॉबेरीची आधुनिक शेती करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

WhatsApp Group
Previous articleपुणे जिल्हा वगळता राज्याच्या इतर भागातील थंडीचा गारठा कमीच
Next articleउद्या शुक्रवारी (ता. 29 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव