Agriculture Breaking News : ग्राहकांचा ओढा वाढल्यामुळे बाजारात अलिकडे तृणधान्याचा खप वाढला असून, शेतकऱ्यांकडूनही तृणधान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा या परिस्थितीत कृषी विभाग आता स्वतंत्र ॲप विकसित करून डी-मार्ट व ॲमेझॉन यासारख्या प्लॅटफॉर्मशी तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना जोडण्याचे काम करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यासंदर्भात निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
Agriculture Department will connect farmers with platforms like D-Mart, Amazon
ग्राहकांची गरज ओळखून सेंद्रिय शेती-विषमुक्त शेती, यासारख्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देखील कृषिमंत्री श्री.मुंडे यांनी कृषी विभागाला दिले आहेत. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव, नांदेड, परभणी, हिंगोली त्याचप्रमाणे विदर्भातील बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ज्वारी, बाजरीचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. तृणधान्यामध्ये असलेल्या पोषणमूल्यांविषयी पुरेशी माहिती नसल्याने आजपर्यंत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या ज्वारी व बाजरीसारख्या शेतीमालास अपेक्षित भाव मिळत नव्हता. मात्र, आरोग्याची काळजी घेत असताना शरीर पोषणासाठी तृणधान्य किती महत्वाचे आहेत, हे ग्राहकांना कळाल्याने आता बाजारात ज्वारी, बाजरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हाॅटेल्समध्येही आता ज्वारी व बाजरीच्या भाकरी मिळू लागल्या आहेत. ही स्थिती लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पिकवलेले तृणधान्य थेट शहरी ग्राहकांमध्ये पोहोचविण्यासाठी डी-मार्ट व ॲमेझॉन यासारख्या प्लॅटफॉर्मशी शेतकऱ्यांना जोडण्याचे निर्देश कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी कृषी विभागाला दिले आहेत.
मूल्यसाखळी विकसित झाल्यास तृणधान्याला चांगल्या भावाची आशा
शेतकऱ्यांकडून केले जाणारे तृणधान्याचे उत्पादन आणि विक्री व्यवस्था वर्षानुवर्षांपासून पारंपारिक पद्धतीनेच चालू आहे. या पिकांच्या बाजारभाव विषयीची सांख्यिकी विश्लेषण माहिती शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात व वेळेवर उपलब्ध होत नाही. पारंपारिक विक्री साखळीमध्ये अडते व व्यापाऱ्यांना धान्य विकले जाते. त्यातून शेतकऱ्यांना फार जास्त पैसे मिळण्याची शाश्वती नसते. परिणामी, शेतकरी तृणधान्य पिकांकडे नगदी पीक म्हणून कधीच पाहत नाहीत. डी-मार्ट व ॲमेझॉन यासारख्या प्लॅटफॉर्मशी शेतकऱ्यांना जोडण्याचे काम झाल्यानंतर ज्वारी व बाजरीसारखे धान्य व्यवस्थित पॅकिंग करून चांगल्या भावात शहरी ग्राहकांना विकले जाईल, शेतकऱ्यांनाही दोन पैसे जास्तीचे त्यामुळे मिळू शकतील.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)