कृषी विभाग शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे प्रत्येक हंगामात माती परीक्षण अहवाल पाठविणार

Government Scheme : माती परीक्षणाच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापन केल्यास पिकांचे पुरेपुर पोषण शक्य होते आणि शेती उत्पादनात वाढ होऊन जमिनीचे आरोग्य देखील जोपासले जाते. माती परीक्षण हा शाश्वत शेतीचा आत्माच असल्याने महाराष्ट्रात टपाल खात्याची मदत घेऊन शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात माती परीक्षण अहवाल पाठविण्याची व्यवस्था आता कृषी विभाग करणार आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Agriculture department will send soil test report to farmers every season through post

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा सह्याद्री अतिथीगृह येथे घेत असताना, मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी आयुक्तालय येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध संचालक व कृषी विद्यापीठांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. शेतातील माती नमुना घेऊन तो माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेत तपासला जातो. त्यातून प्रामुख्याने माती नमुन्याचे रासायनिक पृथक्करण करून त्यातील नत्र, स्फुरद व पालाश यासारखे मुख्य अन्नद्रव्ये तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम व गंधक यासारखे दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, जास्त, मंगल ,तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी केली जाते. या परीक्षणात जमिनीचा सामू ,विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबींची सुद्धा काटेकोरपणे तपासणी केली जाते.आवश्यक असल्यास जमिनीची भौतिक व जैविक गुणधर्माची तपासणी सुद्धा केली जाते. माती परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक असलेली अन्नद्रव्य पिकांना देणे शक्य होत असल्याने जमिनीचा पोत खराब होत नाही. शिवाय रासायनिक खतांचा अनावश्यक वापर थांबल्याने पैशांची मोठी बचत होते. परंतु, शासकीय प्रयोगशाळांमध्ये माती परीक्षणाची सोय असतानाही बऱ्याचवेळा शेतकरी अनास्थेपोटी म्हणा किंवा वेळ नसल्याने त्या भांडगळीत सहसा पडत नाही. त्याचाच विचार करून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे आता माती परीक्षण अहवाल देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. शेतातील मातीचा नमुना परीक्षणासाठी वर्षभर केव्हाही घेता येतो. परंतु, रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर साधारणतः मार्च ते मे या कालावधीत जमिनीत शेणखत टाकण्यापूर्वी मातीचा नमुना घेणे केव्हाही चांगले मानले जाते. त्यादृष्टीने कृषी विभागाकडून मातीचे परीक्षण करण्यासाठी कार्यवाही केली जाईल.

WhatsApp Group
Previous articleकृषी विभाग शेतकऱ्यांना डी-मार्ट, ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मशी जोडणार
Next articleपुणे, नगर जिल्हे वगळता राज्याच्या इतर भागातून थंडी झाली गायब