वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर कुसुंब्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा येथील वीर जवान भानुदास कौतीक पाटील यांना हजारो नागरिकांनी रविवारी (ता.31) साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वीर जवानाचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आला.

जवान भानुदास कौतीक पाटील (वय 55) हे भारतीय सैन्य दलातील भूज‌ येथे 1249 डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॅम्प) प्लाटून 75 इन्फेंन्ट्री ब्रिगेडमध्ये सेवारत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांचा शनिवारी (ता.30) आकस्मिक मृत्यू झाला होता. दरम्यान, शहीद जवानाच्या निधनाची वार्ता कुसुंबा येथे धडकताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी कुसुंब्यात आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…,अमर रहे…वीर जवान भानुदास पाटील अमर रहे’ यासह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार अर्पीत चव्हाण, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, डिफेन्स सिक्युरिटी कॅम्पचे सुभेदार अवतार सिंह, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे हवालदार रतिलाल महाजन, लक्ष्मण मनोरे व सुगंध पाटील, कुसुंबा येथील सरपंच यमुना ठाकरे, पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांचेसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा सचिन यांनी मुखाग्नी दिला. भानुदास पाटील यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.

WhatsApp Group
Previous articleसोमवारी (01 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleअमरावतीच्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात नांदेडच्या रावणची चर्चा