गावशिवार न्यूज | डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अमरावती येथे भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे सुमारे 70 एकरावर यंदा आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी नांदेड जिल्ह्यातील सुनेगावच्या शेतकऱ्याने वाढविलेला रावण हा वळू चांगलाच चर्चेचा विषय ठरला. त्याला पाहण्यासाठी राज्यभरातील पशुपालक शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
Discussion of Ravana of Nanded at Amravati National Agricultural Exhibition
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अमरावतीमधील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात रावण हा चार वर्षांचा वळू खूपच लक्षवेधी ठरला. रावण जेमतेम चार वर्षांचा असला तरी त्याचे वजन सुमारे एक टनापर्यंत असून पाहणारा पाहतच राहील, असा त्याचा रूबाब आहे. त्याच्या शरीराची लांबी तब्बल आठ फूट आहे, तर उंची सव्वासहा फूट. अनेक बाबतीत आपल्या गूण वैशिष्ट्यांमुळे रावण वळू प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष वेधून घेत होता. त्याच्या संगोपनाविषयी देखील पशुपालकांना कुतुहल वाटत होते.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती आणि शेतकऱ्यांविषयी असलेल्या समर्पणाच्या भावनेतून नवी दिल्ली येथे 11 डिसेंबर 1959 ते 27 फेब्रुवारी 1960 या कालावधीत सुमारे 100 एकर जागेवर भव्य दिव्य कृषी प्रदर्शन भरविले होते. तब्बल 82 दिवस चाललेल्या त्या कृषी प्रदर्शनासारखे दुसरे कृषी प्रदर्शन नंतरच्या काळात भारत देशात कधीच भरले नाही. भाऊसाहेबांच्या त्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांच्या स्मृतीदिनी यंदाही करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील रावण वळुच्या हजेरीमुळे अमरावतीच्या त्या कृषी प्रदर्शनाला चार चाँद लागले.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)