शासनाचा मोठा निर्णय ! अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसान भरपाईत ‘इतक्या’ रुपयांची वाढ

गावशिवार न्यूज | अवकाळी पाऊस तसेच गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने यापूर्वी मदतीची रक्कम निश्चित केली होती. त्यात आता भरीव वाढ करण्यात आली असून, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा निर्णय शासनाने (Government Resolutions) घेतला आहे. वाढीव दराने मदत अनुदान देण्याची अंमलबजावणी नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईपासून केली जाणार आहे.

नोव्हेंबर 2023 मधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेले नुकसान तसेच त्यापुढील कालावधीतील अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरीता मंत्री मंडळाने 19 डिसेंबर 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रधान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. विशेष म्हणजे शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर संपूर्ण हंगामात एकाच वेळी अनुदान देय राहील. शासन पूर्वी जिरायत पिकांना 8,500 रूपये मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत देत होते, त्याऐवजी आता 13,600 रूपये मदत 3 हेक्टरच्या मर्यादेत मिळेल. बागायती पिकांना पूर्वी 17 हजार रूपये मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत मिळत होती, त्याऐवजी आता 27 हजार रूपये मदत 3 हेक्टरच्या मर्यादेत मिळेल. बहुवार्षिक पिकांनाही पूर्वी 22,500 रूपये मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत मिळत होती, त्याऐवजी आता 36000 रूपये मदत 3 हेक्टरच्या मर्यादेत मिळेल.

अशी आहे नुकसान भरपाई मदतीच्या अनुदानातील भरीव वाढ
● जिरायत पिकांचे नुकसान- 13 हजार 600 रूपये प्रति हेक्टरी, 3 हेक्टरच्या मर्यादेत
● बागायत पिकांचे नुकसान- 27 हजार रूपये प्रति हेक्टरी, 3 हेक्टरच्या मर्यादेत
● बहुवार्षिक पिकांचे नुकसान- 36 हजार रूपये प्रति हेक्टरी, 3 हेक्टरच्या मर्यादेत

WhatsApp Group
Previous articleशेतकऱ्यांनो लक्ष द्या, प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक
Next articleशेवग्याच्या शेंगांनी नाव काढले, पुण्यात 8000 रूपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव