राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन किर्तनकारांची मदत घेणार

गावशिवार न्यूज | नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार पेरण्यासाठी राज्य शासन आता समाज प्रबोधन करणाऱ्या किर्तन व प्रवचनकारांची मदत घेणार आहे. त्यासाठी शासन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, तिथे प्राधान्याने कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य हाती घेतले जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात वसलेल्या उसाटने-नार्हेणे फाटा येथे आयोजित श्री मलंगगड हरिनाम कीर्तन सप्ताहाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वारकरी संप्रदायाच्या समाज प्रबोधनात्मक कार्याचा गौरवोल्लेख केला. भारत हा तरूणाईचा देश आहे आणि तरूणांमध्ये देश व समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी चांगले करून दाखविण्याची उमेद कायम आहे. देव, देश आणि धर्म जपणारी तरूण पिढी आपण तयार करत आहोत, याची खात्री आजच्या हरिनाम किर्तन सप्ताहाला मिळणाऱ्या प्रतिसादातून येत आहे. महाराष्ट्राला संतांच्या मार्गदर्शनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मोठा वारसा लाभला आहे. संतांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. मराठी संस्कृतीचे वैभव असणारा वारकरी संप्रदाय जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ईश्वर भक्तीच्या मार्गावर चालणे शिकवतो. कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधनही केले जाते. त्यामुळेच महाराष्ट्रात किर्तनकारांना खूप महत्व आहे. सन्मार्गावर चालण्याची शिकवण देण्यासाठी अखंड हरिनाम किर्तन सप्ताहांचे मोठे योगदान आहे आणि ती काळाची गरज आहे. त्याचाच सकारात्मक उपयोग राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी होईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

WhatsApp Group
Previous articleजळगाव जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार, अनावश्यक साठा न करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Next articleउद्योजिका कमलताई परदेशी यांच्या निधनाने गाव खेड्यातील महिलांचा आधारवड कोसळला