गावशिवार न्यूज | महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादीत म्हणजेच ‘महानंद’ तोट्यात गेल्याने सुमारे 1200 कामगारांचे 130 कोटी रूपयांचे वेतन थकले आहे. अशा स्थितीत या प्रकल्पाला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्याचे गुजरात राज्यातील ‘एनडीडीबी’कडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘महानंद’ला ज्यांनी आधी खड्ड्यात घातले त्यांच्याकडूनच आता ‘एनडीडीबी’कडे त्याचे हस्तांतरण करण्यावरून राजकारण केले जात आहे.
(Mahanand Dudh- Maharashtra Rajya Sahakari Dudh Mahasangh Maryadit)
गुजरात राज्याने ज्याप्रमाणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा अमूल ब्रँड विकसित केला, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही महानंद ब्रँड विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न झाले होते. प्रत्यक्षात पिशवीबंद दुधाचे वितरण करीत असताना महानंद हा ब्रँड मुंबई शहरापुरताच मर्यादित राहिला. नंतर त्याचा महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांमध्ये विस्तार झालाच नाही. परिणाम असा झाला की, पुढे जाऊन महानंद हळूहळू तोट्यात जाऊ लागला. नंतरच्या काळात तर तिथे कार्यरत कामगारांचे नियमित वेतन होणे सुद्धा जिकिरीचे ठरले. अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी भांडणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी महानंदला वाचविण्यासाठी कोणतीच हालचाल केली नाही किंवा त्याला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आता उशिरा 1200 कामगारांचे सुमारे 130 कोटी रूपयांचे वेतन थकल्यानंतर महानंदला गुजरात राज्यातील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे (एनडीडीबी) सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्दैवाने त्यातही राजकारण शिरले असून, महाराष्ट्रातील हा प्रकल्प गुजरात राज्यात पळवून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा कांगावा विरोधकांकडून केला जातो आहे.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2024/01/Thumbnail-153-jpg.webp)
महानंद हा प्रकल्प तिथेच राहणार आहे
तोट्यातील महानंद प्रकल्प नफ्यात आणण्यासाठी गुजरात राज्यातील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे (एनडीडीबी) सोपविण्यात आल्यानंतर सध्या आहे त्याच जागेवर राहणार आहे. फक्त त्याचे व्यवस्थापन एनडीडीबीकडे जाणार आहे. त्यातही ठराविक वर्षांसाठी केलेल्या करारानुसार महानंदची सूत्रे एनडीडीबीकडे असतील. त्यानंतर महानंद नफ्यात आल्यावर म्हणजे त्याची गाडी पूर्ववत रूळावर आल्यावर एनडीडीबीचा काहीएक संबंध राहणार नाही. त्यामुळे महानंदला गुजरात राज्यात पळविण्याच्या बाबतीत होत असलेला कांगावा निराधारच आहे. महानंद प्रमाणेच कधीकाळी जळगाव येथील सहकारी दूध संघ सुमारे 16 कोटी रूपयांच्या तोट्यात गेला होता. त्यामुळे संघाला वाचविण्यासाठी एनडीडीबीकडे त्याचा ताबा काही वर्षांसाठी देण्यात आला होता. अर्थात, संघ नफ्यात आल्यानंतर त्याची सूत्रे पुन्हा संचालक मंडळाकडे देण्यात आली होती. आता जळगाव दूध संघ प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)