गावशिवार न्यूज | हिवाळ्याच्या दिवसात सर्वत्र धुक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि दृश्यमानता 500 मीटरपेक्षा कमी राहते. अशा या परिस्थितीत रेल्वेची सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता देखील बळावते. त्यामुळे धुके कमी होत नाही तोपर्यंत रेल्वे गाड्या आहे त्या जागी थांबवून ठेवल्या जातात. प्रवाशांनाही ताटकळावे लागते. या नेहमीच्या समस्येवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन आता ठिकठिकाणी ‘फॉग पास’ उपकरणे बसविणार आहे. (Indian Railway)
हिवाळ्याच्या मोसमात विशेषतः उत्तर भारतात सकाळी धुक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबई, पुणे येथून उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा तसेच पंजाब व जम्मूकडे जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा मोठा खोळंबा होतो. नियमित धावणाऱ्या गाड्या दोन ते सहा तासापर्यंत उशिरा देखील धावतात. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडते. आगावू तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागतो. अनेकांना गाडीला उशीर झाल्याने महत्वाच्या कामाला मुकावे लागते. ही स्थिती लक्षात घेऊनच भारतीय रेल्वेने धुक्यातही गाड्या वेळेवर धावण्यासाठी साधारण 20 हजार फॉग पास उपकरणांच्या खरेदीची तयारी केली आहे. फॉग पास हे जीपीएस यंत्रणेवर आधारित एक दिशादर्शक उपकरण आहे. ज्यामुळे रेल्वे गाडीच्या चालकाला सिग्नल, रेल्वे गेट आणि वेग कमी करण्याच्या ठिकाणांची तत्काळ माहिती मिळणे शक्य होणार आहे. हिवाळ्यात धुक्यामुळे अनेक भागात गाड्या कमी वेगाने धावतात. अशा वेळी फॉग पास हे जीपीएस यंत्रणेवर आधारित उपकरणे रेल्वे चालकाला मदत करतील. फॉग पास हे ताशी 160 किलोमीटरपर्यंतच्या वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे सदरचे उपकरण कुठेही सहज घेऊन जाता येईल इतके हलके आहे.