Artificial Intelligence : बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारीत शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे संपूर्ण जगात अनेक क्रांतिकारी बदल घडताना दिसत असताना आता कृषी क्षेत्र देखील त्याला अपवाद राहिलेले नाही. कारण, बारामती येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने शेती करून पाहण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झालेला आहे. त्याठिकाणी सध्या एआय तंत्राचा वापर करून ऊस, टोमॅटो, मिरची, कोबी, भोपळा आदी काही पिकांवर प्रयोग केले जात आहेत.

बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारीत शेतीचे प्रयोग काही दिवसांपासून सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम यथावकाश समोर आले आहे. त्यानुसार वैशिष्ट्यपूर्ण सेन्सर्सच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारीत शेतीत जमिनीत किती प्रमाणात एनपीके घटक आहेत, त्याची अचूक माहिती मिळू लागली आहे. याशिवाय पाण्याचे मोजमाप आणि ज्या मातीत आपण पीक घेणार आहोत, त्या जमिनीची क्षारता सुद्धा कळत आहे. पीक वाढीवर परिणाम झाल्यानंतर नेमक्या कोणत्या कारणांमुळे किंवा घटकांमुळे तो झाला आहे, त्याची अचूक माहिती तपासण्याचे काम सेन्सर्स करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारीत शेतीसाठी उपयुक्त ठरणारे सेन्सर्स ठराविक वेळेनंतर पिकांच्या क्षेत्रातील आवश्यक ती माहिती गोळा करून ती त्याला जोडलेल्या उपग्रहाला पाठवतात. त्यानंतर उपग्रहाकडून विश्लेषण करण्यात आलेली माहिती इंटरनेटद्वारे संगणकाला पुरविली जाते. त्याआधारेच नंतर पिकाची जोपासना करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, त्याचा अचूक सल्ला संबंधित शेतकऱ्याला मिळतो. या शेती पद्धतीत अंदाजे असे काहीच असत नाही, सर्व काही काटेकोरपणे व मोजून मापून चालते. भविष्यातील शेती कशा प्रकारे केली जाईल, त्याची प्रचिती बारामतीमधील या नवीन प्रयोगावरुन तुम्हाला आलीच असेल.

WhatsApp Group
Previous articleWeather Update : जळगाव जिल्हा वगळता राज्यभरात थंडी उरली फक्त नावाला, पावसाचा इशारा
Next articleGanja Sheti : गच्चीवर फुलवली गांजाची शेती, पोलिसांनी धाड टाकून केली कारवाई