Urea Gold : केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे आता शेतकऱ्यांना सल्फर कोटेड युरिया उपलब्ध होऊ शकणार आहे. प्राप्त माहितीनुसार या नवीन युरियाला गोल्ड संबोधले जाणार असून, बाजारात 40 किलोच्या त्या बॅगची किंमत सुमारे 266.50 रूपये असणार आहे. शेतकरी गोल्ड युरियाचा वापर करून शेती उत्पादन वाढवतील, असा दावा करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या रसायन व खते मंत्रालयाने देशातील सर्व खत उत्पादक कंपन्यांना जारी केलेल्या आधिसुचनेनुसार सल्फर कोटेड युरिया गोल्ड 40 किलो वजनाच्या बॅगमध्ये विकले जाणार आहे. विशेष म्हणजे युरिया गोल्डची किंमत नीम कोटेड युरियाच्या 45 किलो वजनाच्या बॅग इतकीच असणार आहे. नीम कोटेड युरियाच्या एका बॅगेची किंमत सध्याच्या घडीला 266.50 रूपये इतकीच आहे. त्यामुळे सल्फर कोटेड आणि नीम कोटेड युरियाची किंमत सारखीच राहणार आहे. शेतकऱ्यांना कोणतीच जास्तीची किंमत मोजावी लागणार नाही. उल्लेखनीय म्हणजे सल्फर कोटेड युरिया पर्यावरणपूरक असा असेल, असे केंद्राच्या रसायन व खते मंत्रालयाने नमूद केले आहे.
युरिया गोल्डमुळे सुधारेल जमिनीचे आरोग्य
केंद्र सरकारने युरिया गोल्डच्या गुणवत्तेबद्दल बोलताना म्हटले आहे, की सल्फर कोटेड युरियामुळे जमिनीला पुरेपुर पोषक तत्व मिळतील. शिवाय त्यामुळे जमिनीचे आरोग्य जपले जाईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. युरिया गोल्डच्या वापरामुळे जमिनीतील सल्फरची कमतरता भरून निघेल. पिकांच्या मुळ्यांमध्ये नायट्रोजनचा चांगला वापर करण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे सध्या होत असलेला युरियाचा वापर सुद्धा कमी होऊ शकणार आहे. शिफारशीपेक्षा जास्त युरियाचा वापर केल्याने जमिनी नापीक होण्याचे प्रमाण देखील कमी होईल, असा दावा सुद्धा संबंधित मंत्रालयाने केला आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)