Sea Farming : महाराष्ट्राला लाभलेल्या विस्तृत समुद्र किनाऱ्याचा फायदा मच्छीमारांना करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासन आता समुद्र शेतीला चालना देणार आहे. त्यानुसार पालघरपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत खास शेवाळ शेतीसाठी लागणारी जागा 10 ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहे. शेवाळ शेती करण्यास इच्छुक मच्छीमारांना आवश्यक ते प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळ भीव येथे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड आणि मालवण तालुक्यात आचरा येथे शेवाळ शेतीला शासनाकडून चालना देण्यात येणार आहे. शेवाळ शेतीचा हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर अकुशल मच्छीमार व महिलांच्या हाताला काम मिळू शकणार आहे. खाऱ्या पाण्यातील शेवाळच्या उत्पादनाद्वारे मच्छीमारांना ही आगळीवेगळी शेती उदरनिर्वाहासाठी सुद्धा मोठा हातभार लावेल. फक्त मासेमारीवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांच्या आयुष्याला त्यामुळे नक्कीच कलाटणी मिळेल. गुजरात राज्यातील भावनगरच्या सेंट्रल साल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात शेवाळाचे उत्पादन घेण्याकरीता खाऱ्या पाण्यात बीज टाकल्यानंतर साधारणतः महिना-दीड महिन्यात शेवाळ काढणीवर येते. तयार झालेल्या शेवाळचा खाद्य पदार्थांसह सौंदर्य प्रसाधने तसेच औषधीत वापर केला जात असल्याने त्याची खरेदी करण्यासाठी मोठे उद्योजक, कंपन्यांना आमंत्रित केले जाईल. शेवाळ विक्रीतून मिळणाऱ्या कमाईमुळे साहजिक मच्छीमारांना चांगला आर्थिक फायदा होईल. समुद्री शेवाळमध्ये केरीटीन आणि आगार अशी दोन रसायने मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय शेवाळामध्ये उपजतच सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. त्यातील पोषक मूल्ये पाण्यात विरघळल्यानंतर त्याचे खत मिश्रित द्रव्य तयार होते, जे पिकांना दिल्यानंतर उत्पादनात चांगली वाढ होते. अशा विविध उपयोगांमुळे मच्छीमारांनी समुद्र शेतीतून उत्पादित केलेल्या शेवाळला भविष्यात मोठी मागणी राहणार आहे.