गावशिवार न्यूज | स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (ता.12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सदरचा नेत्रदीपक सोहळा देशातील सुमारे 750 जिल्हे आणि देशभरातील विद्यापीठे तसेच महाविद्यालयांमध्ये थेट प्रसारणाद्वारे दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच क्रीडा आणि युवककल्याण मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी दिली. (Narendra Modi)
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा मंत्री श्री. ठाकूर यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘युवाओं के लिए, युवाओं के द्वारा’ अशी या सोहळ्याची संकल्पना असून सन 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र करण्याचा पंतप्रधानांनी संकल्प केला आहे, हाच संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना देतील असेही ठाकूर म्हणाले. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसच अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल नाशिकमध्ये जाऊन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
12,700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन
दरम्यान, आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे; त्यानंतर त्यांचा रोड शो होईल. श्री काळाराम मंदीरात दर्शन घेतल्यानंतर ते रामकुंड इथ गोदावरी नदीची आरती देखील करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मुंबईला रवाना होतील. मुंबईतल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण तसेच 12 हजार 700 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यात सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पाचा पहिला टप्पा, उरण-खारकोपर लोकलचा दुसरा टप्पा, दिघा गाव रेल्वे स्थानक, तसंच पश्चिम रेल्वेमार्गावरच्या खार रोड ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वेमार्गाचं लोकार्पण आणि पूर्व मुक्त महामार्गालगत ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगद्याचं भूमीपूजन, यांचा समावेश आहे. सीप्झमधल्या भारत रत्नम या दागदागिने क्षेत्रासाठीच्या विशेष सुविधा क्षेत्राचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)