शेतकऱ्यांसाठी विदेश दौरे आयोजित करण्याकरीता ‘इतक्या’ कोटी रूपयांचा निधी

गावशिवार न्यूज | राज्यातील शेतकऱ्यांना विविध देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून कृषी विभागाकडून देशाबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करणारी योजना सन 2004/05 पासून राबविली जात आहे. त्याअंतर्गत शासनाकडून सन 2023/24 या आर्थिक वर्षासाठी सुमारे दोन कोटी रूपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून, पैकी 1 कोटी 40 लाख रूपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. (Farmer study tours)

शेतीमालाची निर्यात/कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, शेतीमाल प्रक्रिया यासोबतच विविध देशांमध्ये उपयोगात असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत करावा, यासाठी कृषी विभागाकडून परदेशातील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जातात. त्यामाध्यमातून विदेशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी देऊन राज्यातील शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता देखील जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. सन 2023/24 साठीही शेतकऱ्यांच्या परदेशातील अभ्यास दौऱ्यांना शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार राज्यातील 120 शेतकरी आणि त्यांच्यासोबतच्या 06 अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी 140.00 लक्ष रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने त्यासंदर्भात शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे परदेशातील अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून आतूर असलेल्या शेतकऱ्यांना मोठी संधी चालून आली आहे. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या नजिकच्या कृषी विभागाशी संपर्क साधा.

WhatsApp Group
Previous articleनाशिकच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात जळगावच्या भरीत भाकरीचा डंका
Next articleइंडियन ऑईल देशभरात लवकरच ‘इतके’ इथेनॉल पंप सुरू करणार