कांदा, साखर, तांदूळ, गव्हावरील निर्यातबंदी उठण्याची शक्यता नाहीच

गावशिवार न्यूज | देशातील महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने कांदा, साखर, तांदूळ आणि गहू यांच्या निर्यातीवर बंदी लादली आहे. सदरची निर्यातबंदी कोणत्याही परिस्थितीत उठवली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे इतक्या दिवसांपासून सुरू असलेल्या निर्यातबंदी उठवण्याच्या चर्चांना सध्या तरी पूर्ण विराम मिळाला आहे. (Export Ban)

देशांतर्गत अनियमित पावसामुळे गहू, तांदूळ तसेच साखरेचे उत्पादन घटले आहे. त्यामुळेच बाजारात मैदा, तांदूळ, साखर महाग झाली आहे आणि वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्यातबंदीची पाऊले उचलली गेली आहेत. त्यामुळे आताच्या घडीला केंद्राकडून विविध शेतीमालावर लादलेली निर्यातबंदी हटवण्याबाबतच्या कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच केंद्राकडे निर्यातबंदी हटवावी म्हणून प्रस्ताव देखील दाखल झालेला नाही, असेही केंद्रिय मंत्री श्री.गोयल यांनी स्पष्ट केले. सध्या देशात गहू, तांदूळ आणि साखरेची पुरेशी उपलब्धता आहे, त्यामुळे देशाची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला आयातीची सुद्धा आवश्यकता नसल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इंडोनेशिया, सेनेगल, गॅम्बिया या मित्र राष्ट्रांना भारत देश आगामी काळातही तांदूळ निर्यात सुरूच ठेवणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

WhatsApp Group
Previous articleशेळ्यांपेक्षा बोकडपालन फायदेशीर…तरूण दरवर्षी कसा कमावतो 50 लाख ?
Next articleदेशातील तीन कोटी शेतकऱ्यांसाठी श्री अन्नाचे उत्पादन ठरतेय फायदेशीर