गावशिवार न्यूज | देशांतर्गत महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर मार्च महिन्यापर्यंत बंदी घातली आहे. मात्र, कांद्याची आवक वाढल्यानंतर केंद्र सरकार निर्यातबंदी उठविण्यासाठी विचार करू शकेल. त्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे.
(Onion Export Ban)
केंद्र सरकारने महागाई आटोक्यात आणण्यासाठी कांद्यावर 31 मार्च 2024 पर्यंत निर्यातबंदी लादल्यानंतर राज्यातील शेतकरी कमालीचे संतप्त झाले होते. कारण, केंद्र सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक निर्यातबंदी लादल्याने संपूर्ण राज्यात कांद्याचे भाव कोसळले. विविध कारणांनी आधीच कांद्याची शेती तोट्याची ठरलेली असताना, केंद्राची कांदा निर्यातबंदी शेतकऱ्यांना चांगलीच जिव्हारी लागली. सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत राज्यातील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलनाचा मार्ग देखील पत्करला. बऱ्याच ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद पडले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर तीव्र आंदोलन देखील छेडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे कांदा उत्पादकांच्या आंदोलनाला नवी धार मिळाली. दरम्यान, आपल्याला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांची जाणीव असून कांदा निर्यातबंदी उठली पाहिजे, यासाठी आपण विशेष आग्रही असल्याचे केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नमूद केले आहे.