गावशिवार न्यूज | सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनासोबतच मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी सेंद्रिय उत्पादनांची विश्वासार्हता देखील तितकीच महत्वाची आहे. शेती क्षेत्रात बदल होत आहेत, त्यांची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी पाऊले टाकावी. सेंद्रिय व विषमुक्त शेतीच्या प्रश्नांबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून धोरणात बदल करण्यासाठी आपण स्वतः संबंधित मंत्र्यांबरोबर बैठका घेऊ, असे प्रतिपादन माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. (Sharad Pawar)
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात महाऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य (मोर्फा) आणि आम्रपाली ॲग्रो टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती कार्यशाळेत श्री. पवार बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सेंद्रिय शेतीबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला अतिशय महत्त्व आहे. विषमुक्त व अँटिबायोटिक दुध उत्पादन काळाची गरज असून अशा दुधाला योग्य किंमत मिळण्यासाठी शासन व खासदार शरद पवार यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला व ए टू मिल्क दुधाला चांगली बाजारपेठ मिळाल्यास सेंद्रिय शेती करणारा शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे अंकुश पडवळे यांनी नमूद केले.
मार्केटिंगमध्ये शासनाच्या मदतीची गरज
सेंद्रिय व विषमुक्त शेती करणारे शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत पण मार्केटिंगमध्ये शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहे. खासदार शरद पवार यांनी राज्य व केंद्र सरकार बरोबर सेंद्रिय शेतीच्या प्रश्नाबाबत अनेक बैठका घेऊन राज्याचे सेंद्रिय शेतीचे धोरण बनविण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे. यापुढे आपणाला नैसर्गिक शेतीपेक्षा शाश्वत सेंद्रिय शेतीची गरज असून त्यादृष्टीने मोर्फा संघटना राज्यामध्ये पाऊले टाकत असल्याचेही पडवळे यांनी सांगितले.