गावशिवार न्यूज | राज्यात ढगाळ वातावरण निवळल्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढत असल्याचे संकेत मिळत असतानाच, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा नवा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसासोबत थंडीचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Weather Update)
उत्तर भारतात काही दिवसांपासून थंडीची लाट आली असून, पुढील काही दिवस उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही थंडी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यासोबत महाराष्ट्रातील विदर्भात 22, 23 आणि 24 जानेवारीला तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्रातही पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडचिरोली व चंद्रपुरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासात उत्तर भारतात थंडीची लाट आल्यानंतर त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.
जळगावमध्ये 9.0 अंश सेल्सिअस तापमान
दरम्यान, हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जळगाव जिल्ह्यात सोमवारी (ता. 22 जानेवारी) सकाळी साडेआठ वाजता किमान 9.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. याशिवाय नाशिकमध्ये किमान 11.4, मालेगावात 11.8, पुण्यात 12.1 तसेच छत्रपती संभाजीनगरला 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.