केंद्रिय कापूस संशोधन संस्था बोंडसड नियंत्रणासाठी राबविणार विशेष प्रकल्प

गावशिवार न्यूज | बीटी कपाशीची लागवड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना बोंडअळीसोबत आता बोंडसडच्या नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या कापूस उत्पादकांना मोठे नुकसान देखील सोसावे लागले आहे. यापार्श्वभूमीवर नागपूर येथील केंद्रिय कापूस संशोधन संस्था कपाशी पिकातील बोंडसड नियंत्रणासाठी आता विशेष प्रकल्प राबविणार आहे. (Cotton Research)

तीन वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणाऱ्या कपाशी पिकातील बोंडसड रोगाच्या नियंत्रणासाठी एका खासगी कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून एक कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीची मदत केली आहे. यामाध्यमातून बोंडसड होण्यासाठी कारणीभूत ठरणारी बुरशी व इतर काही घटक यांचा बारकाईने अभ्यास केला जाणार असल्याची माहिती नागपुरच्या केंद्रिय कापूस संशोधन संस्थेचे कापूस तज्ज्ञ डॉ. दीपक नगराळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. बोंडसड रोगाचा प्रादुर्भाव केवळ भारत देशात नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानात, चीनमध्ये आणि अमेरिकेत देखील आढळला आहे. त्याठिकाणच्या संशोधकांना कपाशी पिकातील बोंडसडवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात अद्याप यश आलेले नसताना, भारतातील केंद्रिय कापूस संशोधन संस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

बोंडसड प्रतिकारक नवे वाण शोधण्यावर भर
कपाशी पिकातील बोंडसडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्रिय कापूस संस्थेकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध प्रकारच्या ट्रायल सध्या संस्थेच्या प्रक्षेत्रावर घेतल्या जात आहेत. कापूस बियाणे उत्पादक कंपनी राशी सीड्सने महाराष्ट्रातील संशोधनासाठी सुमारे 85 लाखांचा निधी त्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे बोंडसड रोगाला प्रतिकारक असलेले कापसाचे नवीन वाण निवड पद्धतीने संशोधित करण्यासाठी नागपुरला संशोधन सुरू आहे, अशी माहिती सुद्धा डॉ. दीपक नगराळे यांनी दिली.

WhatsApp Group
Previous articleमंगळवार (23 जानेवारी) बऱ्हाणपूर,रावेर, चोपडा,जळगाव येथील केळीचे भाव
Next articleउत्तर महाराष्ट्रात थंडीचा गारठा कायम, जळगावचा पारा 9.6 अंश सेल्सिअस