गावशिवार न्यूज | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ जाहीर केली असून, या योजने अंतर्गत देशातील सुमारे एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनल मिळणार आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होण्यास त्यामुळे मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे ऊर्जा क्षेत्रात भारत देश आत्मनिर्भर होण्यासाठी या योजनेची मदत होऊ शकणार आहे. (PM Suryoday Yojana)
प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही केंद्र सरकारकडून 40 गीगावॉट रूफटॉप सोलर क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक महत्वपूर्ण भाग असणार आहे. सदरच्या योजनेतून फक्त गरीब आणि मध्यमवर्गीयांना लाभ देण्यात येणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली सूर्योदय योजनेची घोषणा वाढत्या वीज बिलांमुळे हैराण झालेल्या देशातील नागरिकांसाठी निश्चितच मोठी भेट ठरणार आहे. सूर्योदय योजनेमुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकेल. याशिवाय विजेचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होऊन सरकारवरील वीज निर्मितीचा वाढता ताण देखील कमी होईल.
सूर्योदय योजनेचा यांना मिळेल लाभ
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेतून सोलर उर्जेवर चालणाऱ्या यंत्रणेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारत देशाचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा दीड लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना सूर्योदय योजनेचा कोणताच लाभ मिळणार नाही. योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे अधिकृत वेबसाईटवर अर्जदाराला अपलोड करावी लागतील.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
● अर्जदाराचे आधार कार्ड
● रहिवास प्रमाणपत्र
● विजेचे बिल
● अर्जदाराचा उत्पन्न दाखला
● मोबाईल नंबर
● बँक पासबुक
● पासपोर्ट साइज फोटो
● रेशन कार्ड
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)