गावशिवार न्यूज | भारतात आयात होवून रुजलेल्या नव्या ‘आरा’ रेड सिलेक्शन वाणाच्या द्राक्षांना शुक्रवारी (ता. 26 जानेवारी) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोने येथील भास्कर कांबळे यांच्या शेतात झालेल्या ऑनलाईन लिलावात प्रति किलो 260 रुपयांचा दर मिळाला. नेपाळमधील काठमांडू तसेच देशाच्या विविध भागातून द्राक्ष व्यापारी खरेदीदार या ऑनलाईन लिलावात सहभागी झाले होते. ( Sahyadri Farms)
‘आरा’ रंगीत द्राक्ष वाणांच्या द्राक्षांना अनोखी चव, गंध आणि कुरकुरीतपणा असल्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी होत असल्याचे खरेदीदार व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. दर्जेदार द्राक्ष वाणांच्या उपलब्धते बरोबरच त्याची बाजार व्यवस्था मजबूत करण्यावर ‘सह्याद्री फार्म्स’कडून भर दिला जात आहे. निर्यातीबरोबरच देशांतर्गत बाजारातही आरा रंगीत वाणांच्या द्राक्षांना मोठी मागणी होत आहे.
पहिल्या सेल डे ला देखील मिळाला होता 260 रुपये प्रति किलोचा दर
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधत सोमवारी (ता. 22 जानेवारी) देखील सह्याद्री आळंदी झोन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक कैलास माळोदे यांच्या रवळगाव (ता. जि. नाशिक) येथे ‘आरा’ रंगीत द्राक्ष वाण पाहणी व विक्री दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक व खरेदीदार व्यापाऱ्यांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. ऑनलाइन द्राक्ष लिलावात कैलास माळोदे यांच्या ‘आरा’ रंगीत द्राक्षांना बॉक्सला 1250 रुपये म्हणजे प्रति किलो 260 रुपये दर मिळाला होता. द्राक्ष शेतीच्या आता पर्यंतच्या इतिहासात थेट शिवार खरेदीत शेतकऱ्याला मिळालेला तो सर्वाधिक उच्चांकी दर होता.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)