गावशिवार न्यूज | उन्हाळी हंगामात भुईमूगाचे चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे राज्यातील शेतकरी थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर लगेचच भूईमूग लागवडीला सुरूवात करतात. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारीत जातींची लागवड केल्यानंतर भुईमुगाच्या उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ मिळू शकते. आजच्या लेखात आपण उन्हाळी लागवडीसाठी योग्य भुईमुगाच्या काही वाणांची माहिती घेणार आहोत. (Summer groundnuts)
भुईमूग पीक भुसभुशीत जमिनीत घेतल्यास मुळ्यांची चांगली वाढ होऊन शेंगा पोसण्यासाठी मोठी मदत होते. भुईमूग लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी वाळू व सेंद्रिय खतांचा भरपूर वापर असलेली जमिन योग्य मानली जाते. काही शेतकरी डिसेंबर महिन्यापासूनच उन्हाळी भूईमुगाच्या लागवडीला सुरूवात करतात. मात्र, उन्हाळी भूईमूग लागवडीची योग्य वेळ ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी असते. या कालावधीत थंडी कमी होऊन बियाण्याची उगवण देखील पुरेपुर होते. उशिरा पेरणी केल्यास भुईमुगाच्या उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी लागवडीसाठी उपट्या प्रकारातील काही वाणांची माहिती आज आपण घेणार आहोत.
जेएल 501 :
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी भुईमुगाचे जेएल 501 हे वाण प्रसारित आहे. 110 ते 115 दिवसांच्या कालावधीत शेंगा काढणीवर येतात. खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे. हेक्टरी 30 ते 32 क्विंटल उत्पादन अपेक्षित असते. दाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण जवळपास 49 टक्के असते.
टीजी-26 जेएल :
संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित वाण असून, खरीप व उन्हाळी हंगामासाठी शिफारस आहे. पिकाचा कालावधी 110 ते 115 दिवस आहे. शेंगांचे हेक्टरी उत्पादन 25 ते 30 क्विंटल मिळते.
एसबी 11 :
संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारीत वाण असून, खरीप व उन्हाळी हंगामासाठी शिफारस आहे. 115 ते 120 दिवसात पीक काढणीवर येते. ओलिताची सोय नसल्यास कोरडवाहू जमिनीतही लागवड करता येते. शेंगांचे हेक्टरी उत्पादन 15 ते 20 क्विंटल मिळते.
टीएजी- 24 :
संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारीत असून, खरीप व उन्हाळी हंगामासाठी शिफारस आहे. 110 ते 115 दिवसात भुईमुगाच्या शेंगांची काढणी होते. हेक्टरी उत्पादन 25 ते 30 क्विंटल मिळते.
टीपीजी-49 :
रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शिफारस केली जाते. जळगाव, धुळे, अकोला जिल्ह्यांकरीता प्रसारीत वाण आहे. साधारणपणे 125 ते 130 दिवसात काढणीवर येते. दाणे टपोरे असतात आणि हेक्टरी 25 ते 30 क्विंटल शेंगांचे उत्पादन मिळते.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)