तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पातून जूनपर्यंत पाणी अडविण्याचे नियोजन

गावशिवार न्यूज | तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 4890 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. सात उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्यासाठी केंद्राची मदत मिळणार आहे. जून 2025 पर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे नियोजन आहे. केंद्र शासनाची मदत घेऊन निधी‌ कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. (Ajit Pawar)

अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे प्रस्तावित असलेल्या निम्न तापी प्रकल्प धरणाची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केली. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, पाडळसे प्रकल्प दोन जिल्ह्यांना संजीवनी‌ ठरणारा प्रकल्प आहे. आर्थिक निधीसाठी केंद्राच्या मंजुरीसाठी प्रस्ताव आहे. 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

तापीवरील पाडळसरे प्रकल्पाची वैशिष्ट्ये
अमळनेर तालुक्यात तापी नदीवर निम्न तापी प्रकल्प सन 1999 पासून बांधकामाधीन आहे. एकूण लाभक्षेत्र 43600 हेक्टर इतके नियोजित असून त्यासाठी 17.01 TMC पाणी वापरास मंजुरी प्राप्त आहे. या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, धरणगाव व पारोळा आणि धुळे जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा या तालुक्यांना लाभ होईल. हा प्रकल्प दोन टप्यात करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टण्यात 10.40 TMC पाणीवापर करुन 25,657 हेक्टर लाभक्षेत्र तयार होणार आहे. या प्रकल्पाच्या टप्पा 1 साठी 2472 हेक्टर भूसंपादन आवश्यक असून, त्यापैकी 770 हेक्टर संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे. तसेच 5 गावे पूर्णतः आणि 6 गावे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहेत, त्यापैकी 3 गावांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाली असून 1 गावाची प्रक्रिया प्रगतीत आहे. 7 गावांसाठी जागा निश्चिती करिता कार्यवाही प्रगतीत आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत एकूण 763 कोटी रूपये खर्च झाले आहेत. या आर्थिक वर्षात 100 कोटी रूपये एवढी तरतुद आहे. या प्रकल्पाला नुकतीच 4890 कोटी‌ रूपये एवढ्या अद्यावत किंमतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

पाडळसरे प्रकल्पाची सद्यःस्थिती
मुख्य धरणाच्या सांडवाचे काम व माती धरणाचे 75% काम पूर्ण झाले आहे. या हंगामात प्रस्तंभाचे बांधकाम 155 मी पर्यंत पूर्ण करण्याच्या नियोजनानुसार काम प्रगतीत व त्यासोबत वक्राकार द्वार निर्मिती कामे क्षेत्रीय स्थळी सुरू आहे. पाच शासकीय उपसा सिंचन योजनेची सर्वेक्षण पूर्ण संकल्पन कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. पाच पूर्णतः आणि सहा अंशतः असे 11 गावांच्या पुनर्वसनापैकी 3 गावांचे पुनर्वसन पूर्ण आणि मौजे सात्री या गावाच्या नागरी सुविधांचे 50% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीत आहे. भूसंपादनाच्या अनुषंगाने संयुक्त मोजण्या व न्यायालयीन प्रकरणे तसेच निवाड्याच्या रकमा अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

WhatsApp Group
Previous articleराज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच किमान तापमानात झाली वाढ
Next articleहिंगोलीत तुरीला मिळाला सर्वाधिक 10,999 रूपये प्रति क्विंटलचा भाव